![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : जुनी पेंशन नाकारणे ठरु शकते टेंशन? मतविभाजनाचा धक्का कोणाला? प्रस्थापितही धास्तावले
काँग्रेसने पाठ फिरवल्याने झाडे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होऊ लागली आहे. दलित मतांवर दावा सांगणारे अनेक उमेदवारही रिंगणात आहेत. ही मते आघाडीकडे वळवण्यासाठी अडबाले यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
![Nagpur : जुनी पेंशन नाकारणे ठरु शकते टेंशन? मतविभाजनाचा धक्का कोणाला? प्रस्थापितही धास्तावले Can the rejection of old pension scheme create tension for the BJP Who is pushed by vote division Nagpur : जुनी पेंशन नाकारणे ठरु शकते टेंशन? मतविभाजनाचा धक्का कोणाला? प्रस्थापितही धास्तावले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/17/f53c8dd95466a56f7f06edf0c71730991671261132734398_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ही निवडणूक चर्चेत राहिली आहे. अवघ्या एकोणचाळीस हजारांच्या घरात मतदार असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल 22 उमेदवार लढत देत असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजानाचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पहिला पसंती कोटा पूर्ण करणे अवघड असल्याने धक्कादायक निकालाची शक्यता नाकारात येत नाही. तसेच जुन्या पेंशन योजनेवरुन भाजपला घेरण्याची तयारी अनेक उमेदवारांनी केली असल्याने जुनी पेंशन योजना भाजप समर्थित उमेदवारासाठी टेंशन ठरु शकते.
बंडखोरीपासून वाचण्यासाठी भाजपने एक दिवसापूर्वी नागो गाणार यांचे नाव जाहीर केले. तर काँग्रेसने शेवटपर्यंत तळ्यात-मळ्यात करुन, तसेच नेत्यांमधील वाद चव्हट्यावर आणल्यानंतर सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपकुमार खोब्रागडे, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे, बसपाच्या रिमा रंगारी, राष्ट्रवादीचे भंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यासह सुमारे दोन डझन उमेदवार मतांचे गठ्ठे घेऊन बसले आहेत. ते फोडण्याची कसरत प्रस्थापितांना करावी लागणार आहे.
जुनी पेंशन नाकारणे ठरु शकतो टेंशन?
भाजप समर्थित नागो गाणार यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह भाजपची फौज आहे. असे असले तरी गाणारांना तिसऱ्यांदा संधी दिल्याने अनेकांची नाराजी कायम आहे. त्यांच्या समर्थनाची घोषणा लांबवून भाजपने प्रत्यक्ष बंडखोरी होऊ दिली नाही. असे असले तरी मतदानातून काही मतदार आपला रोष व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या बड्या नेत्यांनाही हा धोका जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना कामाला लावण्यात आले आहे. यात जुनी पेंशन योजना नाकारण्याचा भाजप नेतृत्वाचा स्पष्टपणा गाणारांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राजेंद्र झाडे यांनी जुनी पेंशन योजना याचा भावनिक मुद्दा तयार करत शिक्षकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
...म्हणून शिवसैनिकांचा काँग्रेसवर रोष
गाणारांसमोर अनेक आव्हाने असली तर महविकास आघाडीचे समर्थन लाभलेले सुधाकर अडबाले सहजासहजी जिंकून येतील असे समजण्याचे कारण नाही. गंगाधर नाकाडे यांना उमेदवारी देऊन माघार घ्यायला लावल्याने शिवसैनिकांचा रोष काँग्रेसवर आहे. शिवसेनेचे नेते खुलेपणाने प्रचारात उतरल्याचे अद्यापही दिसत नाही. सेनेचे मतदार अडबाले यांना धक्का देऊ शकतात. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजेंद्र झाडे यांच्यासाठी ही लढाई आरपारची आहे. शिक्षक भारतीचाही सर्व रोष काँग्रेसवरच आहे. झाडे यांच्यासाठी ही निवडणूक आरपारची लढाई आहे. काँग्रेसने पाठ फिरवल्याने झाडे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होऊ लागली आहे. दलित मतांवर दावा सांगणारे अनेक उमेदवारही रिंगणात आहेत. ही मते आघाडीकडे वळवण्यासाठी अडबाले यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
ही बातमी देखील वाचा...
नागपूर जिल्ह्यातील बेलतरोडी, घोगली ग्रामपंचायत बरखास्त ; बेसा-पिपळा नवीन नगरपंचायत घोषित; कोणत्या भागांचा समावेश, जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)