लॉकडाऊनमध्ये सरकारने दिलेल्या कमी किमतीतल्या धान्याचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री
लॉकडाऊनमध्ये सरकारने कमी दरात धान्य उपलब्ध करुन दिलं. तसंच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनीही मोठ्या प्रमाणावर धान्य आणि घरगुती साहित्य दान केले. मात्र काही टोळ्या त्यावेळचं धान्य आणि इतर वस्तू स्वस्तात खरेदी करुन पुन्हा बाजारात 15 आणि 20 रुपये किलोने विकत आहेत.
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सरकारने अतिरिक्त धान्य वाटप केले. सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही त्यात पुढाकार घेतला. मात्र, तेव्हा नियोजनशून्य पद्धतीने झालेल्या वाटपाचे दुसरे पैलू समोर येत आहे. सरकार, सामाजिक संस्था आणि दानशुरांनी वाटलेल्या धान्याचा काळाबाजार होऊन तेच धान्य वाढीव किमतीत बाजारात विक्रीला येत आहे. एबीपी माझाच्या हाती त्यासंदर्भातले सबळ पुरावे लागले आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणावर झालेल्या हल्ल्यामधील टोळक्याच्या अटकेनंतर या गोष्टीचा खुलासा झाला आहे.
काही गुंड प्रवृत्तीचे लोक लॉकडाऊन काळात सरकारने वाटलेलं रेशनचं कमी दरातील धान्य खरेदी करत असल्याचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहेत. "रेशनचं हे धान्य आम्ही 10 रुपये किलोने खरेदी करतो. तुमच्याकडे कितीही धान्य असले तरी आम्ही ते सर्व 10 रुपये किलोने खरेदी करु, असं हे गुंड व्हिडीओमध्ये बोलत असल्याचं दिसतं.
नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा टोळ्या फिरत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून मिळालेल्या मोफत आणि 2 आणि 3 रुपये किलो दराने दिलेल्या धान्याची ते खरेदी करत आहेत. लॉकडाऊनमध्ये विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनीही मोठ्या प्रमाणावर धान्य आणि घरगुती साहित्य दान केले. त्यावेळचा धान्य आणि इतर वस्तू अशा टोळ्या स्वस्तात खरेदी करुन ते बाजारात विक्रीला आणत आहे. त्यासाठी 2 रुपये आणि 3 रुपये किलोच्या धान्यात काही चांगले धान्य मिसळून तेच पुन्हा बाजारात 15 आणि 20 रुपये किलोने विकत आहेत. गरीब लोकही त्यांचे उत्पन्न आधीसारखं नसल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मिळालेले अतिरिक्त धान्य आणि वस्तू विकून त्यांचा सध्याचा खर्च भागवत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कोणतेही नियोजन न करता जे धान्य वाटप झाले त्याचेच हे परिणाम असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अनुसूया काळे छाबरानी यांनी केली आहे.दरम्यान हे फक्त नागपुरात घडतंय असे नाही. नागपूर जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अशा टोळ्या झोपडपट्ट्यांमध्ये, विविध वस्त्यांमध्ये लोकांच्या घरी साठवलेले धान्य आणि इतर वस्तू स्वस्तात खरेदी करुन पुन्हा बाजारात विक्रीला आणत आहे. ही नुसती काळाबाजारी नाही तर संकटाच्या काळात मदत करण्याचा चांगल्या उद्दिष्टाचा पराभवही आहे. अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांनी या टोळ्यांना अद्दल घडवण्याची गरज आहे.