ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
भाजपच्या कार्यालयातून मल्लिकार्जुन रेड्डी यांना पत्र पाठवण्यात आले असून आपली पक्षातून निलंबन करण्यात येत असल्याचंही त्या पत्रात म्हटलं आहे.
नागपूर : भाजपचे माजी आमदार मालिकार्जून रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वारंवार पक्षाची शिस्त मोडून पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. नुकतेच, नागपूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकमधून रामटेकचे (nagpur) आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. महायुतीचा घटक पक्ष असतांना मालिकार्जुन रेड्डी यांनी याचा विरोध केला व आपली भूमिका ही भाजपची भूमिका असल्याचे भासवल्याने त्यांच्यावर आता पक्षाने कारवाई केली आहे. तसेच, ऐन विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांची घोषणा होताच त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलीय. तर, पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनीही आक्रमक पवित्रा घेत "आता कॉम्प्रोमाइज नाही,आता रामबाण निघाला आहे", असे म्हणत विधानसभा निवडणुकांत बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले.
भाजपच्या कार्यालयातून मल्लिकार्जुन रेड्डी यांना पत्र पाठवण्यात आले असून आपली पक्षातून निलंबन करण्यात येत असल्याचंही त्या पत्रात म्हटलं आहे. नमस्कार, आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी असताना पक्ष विरोधी कारवाया करत पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. आपली ही कृती पार्टीचा अनुशासन भंग करणारी असून आपल्याला 6 वर्षांकरिता पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, अशा आशयाचे हे पत्र आहे. भाजपचे कार्यालयीन सचिव मुकूंद कुलकर्णी यांच्या सहीने हे पत्र मल्लिकार्जून रेड्डी यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर, रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. तसेच, आता रामबाण निघाला आहे, कॉम्प्रमाईज नाही, असेही त्यांनी म्हटलंय.
भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबन झालेल्या माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पक्षाला इशारा देत "आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट होईल", असं म्हणत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमधून बंडखोरी करणार असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले ही माहिती समजल्यानंतर काही कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार जेव्हा मल्लिकार्जुन रेड्डी यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मी "कोणत्याही स्थितीत कॉम्प्रमाइज करणार नाही, मी कॉम्प्रमाईज करणारा नाही" अशी भूमिका व्यक्त केली. 20 वर्षांपासून आशिष जैस्वाल कोणाची तरी मदत घेऊन निवडणूक जिंकत आला आहे, त्याच्यामुळे रामटेकमध्ये भाजप संपत चालली आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी केला.
हेही वाचा
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?