Nagpur Ganeshotsav 2022 : भाविकांसाठी गणरायाच्या दर्शनासह 'बुस्टर डोस'चीही व्यवस्था, नागरिकांकडूनही निर्णयाचे स्वागत
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एकमात्र पर्याय असून गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी लसीकरण स्टॉल्सवर याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नागपूर: दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात खबरदारी म्हणून नागरिकांसाठी शहरातील अनेक मोठ्या गणेश मंडळांमध्ये 'बुस्टर डोस'चे (Booster Dose) स्टॉल्स लावण्यात आले आहे. याठिकाणी कोव्हीशिल्ड (covidshield), कोवॉक्सिन (covaxin booster dose) दोन्ही लसींची मात्रा उपलब्ध आहे. गणेशोत्सव मंडळांनी (Ganesh Mandal Nagpur) लसीकरणाचे स्टॉल्स लावावे या प्रशासनाच्या आवाहनाला गणेश मंडळांकडूनही चांगला प्रतिसाद मिळात आहे. तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांना लसीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे, हे विशेष. पहिल्याच दिवशी मनपाच्यावतीने 14 गणेश मंडळात लसीकरण करण्यात आले. यामध्ये 318 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य विभागाला बूस्टर डोस लावण्यासाठी स्टॉल करिता जागा द्यावी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला बुस्टर डोस देऊन कोरोना पासून सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षानंतर कोरोनाच्या सावटातून बाहेर पडल्यानंतर हा गणेश उत्सव (Ganesh Chaturthi 2022) होत आहे. मात्र जगातल्या अनेक भागात कोरोना अद्याप असून कोरोना पासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आपल्या आरोग्याप्रती जागरूकता दाखवून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) स्पष्ट केले.
यासोबतच गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत शिस्त ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय विसर्जन हे कोणत्याही परिस्थितीत सर्व ठिकाणी कृत्रिम जलकुंभात झाले पाहिजे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होता कामा नये, असेही त्यांनी पोलीस विभागाला स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) सर्व मिरवणुकीच्या ठिकाणी व विसर्जनाच्या ठिकाणी कुत्रीम जलकुंभाची, प्रकाशाची व अन्य आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याच्या ग्रामीण (Rural Nagpur) भागात तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा कृत्रिम जलकुंभ तयार करून त्याच ठिकाणी विसर्जन करावे. नैसर्गिक जलसाठे (Natural Water Sources) अशुद्ध होणार नाही. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.
भाविकांनी घ्यावा लसीकरणाचा लाभ
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एकमात्र पर्याय असून गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी लसीकरण स्टॉल्सवर याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या