बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना बार्शीकरांनी धक्का दिला असून इथे भाजपने पुन्हा सत्ता काबिज केली आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बार्शी नगरपालिकेवर आपली सत्ता काबिज ठेवण्यात भाजप (BJP) नेते राजेंद्र राऊत यांना यश मिळालं आहे. गत 2016 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मोठा विजय मिळवत राऊत यांनी बार्शी नगरपालिकेवर सत्ता मिळवली होती. मात्र, नुकत्याच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना जवळपास 6 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. आधी लोकसभा निवडणुकीत बार्शीतून (Barshi) महाविकास आघाडीला मोठा लीड, त्यानंतर विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे दिलीप सोपल विजयी झाल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर, नगरपालिका निवडणुकीतून राजेंद्र राऊत यांनी कमबॅक केलं असून बार्शी नगरपालिकेवर भाज महायुतीचे 23 नगरसेवक निवडून आले आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेना महाविकास आघाडीचे 19 उमेदवार विजयी झाले आहेत.
बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना बार्शीकरांनी धक्का दिला असून इथे भाजपने पुन्हा सत्ता काबिज केली आहे. येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले 4639 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर, भाजपा 17, शिवसेना 6 असे महायुतीचे एकूण 23 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाला 19 जागांसह विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नुकतेच कृषि उत्पन्न बाजार समिती आणि आता नगरापालिका निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता मिळवल्याने मागील पराभवातून कमबॅक केल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात 18-0 अशा मोठ्या फरकाने राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीचा विजय झाला होता. त्यावेळी, माजी चेअरमन रणवीर राऊत यांनी वडिलांशी गळाभेट घेताना दोघांचेही डोळे पाणावल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आता, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकू
बार्शी नगरपरिषदेची सत्ता काबीज केल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष केला. ‘’विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. मात्र, बाजार समिती निवडणूक आणि नगरपालिकेमध्ये ती कसर आम्ही भरून काढली. या तालुक्यातील आणि शहरातील जनतेचे आम्ही मनापासून आभार मानतो. रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करतो. आता, सहापैकी सहा जिल्हापरिषद आणि 12 पैकी 12 पंचायत समित्या निवडून आणण्याचा संकल्प आम्ही करत आहोत‘’, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विजयानंतर दिली
मुख्यमंत्र्यांकडून फोनद्वारे अभिनंदन
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप नेते राजेंद्र राऊत याचं अभिनंदन करत बार्शीकरांचे आभार मानले आहेत. बार्शी नगरपालिकेवर एक हाती सत्ता आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन अभिनंदन केले, बार्शीकरांचे आभार मानले.























