(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : महाज्योतीतून तायवाडे, गमे, वडलेंची सुट्टी; सरकारकडून नियुक्त्या रद्द
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली.
नागपूर: महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने हाती सुत्रे घेतली. यासोबतच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. याच मालिकेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) (Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute) वर नियुक्त महाविकास आघाडीचे तीन अशासकीय सदस्य कॉंग्रेसचे नेते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबन तायवाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे व शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाज्योती या ओबीसी, विजेएनटी व एसबीसी विद्यार्थी व समाजासाठी स्थापन झालेल्या संस्थेवरील अशासकीय संचालकांची नेमणूक म्हणून 11 ऑगस्ट 2020 ला शासन निर्णयाद्वारे केली होती. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता 'महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली.
824 कोटींचा निधी खेचून आणला
स्थापनेनंतर अशासकीय संचालकांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाकडून सुमारे 824 कोटींचा निधी मिळविला. विद्यार्थ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या. 11वीच्या विद्यार्थ्यांना जेईई-नीटचे (JEE-NEET) मोफत ऑनलाइन प्रशिक्षण, टॅब व दररोजचे 6 जीबी इंटरनेट, कमर्शियल पायलट ट्रेनिंग, ज्ञानज्योती सावित्री बाई फुले यांच्या जन्मगावी नॅशनल डिफेंस अकादमी स्पर्धा पूर्व 200 मुलींचे मोफत निवासी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी (OBC Students) स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर विविध लाभाच्या व स्पर्धा पुर्व प्रशिक्षणाच्या मोफत योजना राबविण्यात आल्या, अशी माहिती माजी सदस्यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या