Abhijit Wanjari : आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागलीये, शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांची टीका
इतर शासकीय विभागात तुम्ही असे म्हणून शकता का अधिकाऱ्यांना की तुमच्या पगारातून पैसे गोळा करुन तुमच्या कार्यालयाचा मेंटनन्स करा, असे म्हणण्याची त्यांची हिंमत आहे का? असा सवालही वंजारी यांनी केला.
नागपूरः भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागली आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्त्व्य करत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निर्मिती घटनेने केली आहे. प्रशांत बंब यांच्या वडिलांनी केलेली नाही, अशी टीका विधानपरिषदेच्या नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार व काँग्रेस (Congress) नेते अभिजीत वंजारी (Abhijit Wanjari) यांनी केली आहे.
प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या अवस्थेबद्दल सरकार आणि त्यांच्यासारखे आमदारच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्षकांवर आगपाखड करू नये असा इशाराही अभिजीत वंजारी यांनी दिला आहे.
परिषदेचे रचनेत विधानसभेच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या आमदारांसह शिक्षक, पदवीधर आणि राज्यपाल नियुक्त आमदार अशी विशेष रचना आहे. त्यामुळे विधानसभेचे आमदारांनी विधान परिषदे संदर्भात ढवळाढवळ करू नये, असा इशाराही वंजारी यांनी दिला आहे.
प्रशांत बंब यांनी त्यांच्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्वरित सार्वजनिक माफी (Public apology) मागावी अन्यथा शिक्षक आणि पदवीधर संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात आंदोलन (Protest) करू असेही अभिजीत वंजारी म्हणाले.
बंब यांना लाज वाटायला हवीः वंजारी
शिक्षकांनी आपल्या पगारातून दहा दहा हजार रुपये जमा करुन शाळेची देखभाल-दुरुस्ती करावी, असा सल्ला प्रशांत बंब यांनी दिला. मात्र त्यांना हे बोलण्यापूर्वी लाज वाटायला हवी. इतर शासकीय विभागात तुम्ही असे म्हणून शकता का अधिकाऱ्यांना की तुमच्या पगारातून पैसे गोळा करुन तुमच्या कार्यालयाचा मेंटनन्स करा, असे म्हणण्याची त्यांची हिंमत आहे का? असा सवालही कॉंग्रेसचे पदीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते प्रशांत बंब?
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांची मुळात गरजच नाही, असे वादग्रस्त विधान औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभेचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केले होते. त्यांच्या या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलने करण्यात आली असून शिक्षक संघटनांनीही याचा विरोध केला आहे. तसेच बंब यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
संबंधीत बातम्या