Nagpur News : डॉक्टर नसल्यानं चक्क कम्पाऊंडर कडून रुग्णांवर उपचार; नागपूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रावरील धक्कादायक प्रकार
नागपुर महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना उपचार देण्यासाठी डॉक्टर्सचं उपलब्ध नसल्याने चक्क नर्स आणि कंपाउंडर रुग्णांना औषधी देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नागपूर : देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट (Coronavirus) आणि इतर साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे देशासह संपूर्ण राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. असे असताना मात्र, नागपुरातील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (Nagpur Primary Health Center) नागरिकांना उपचार देण्यासाठी डॉक्टर्सचं उपलब्ध नसल्याचा चित्र आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून चक्क नर्स आणि कम्पाऊंडर रुग्णांना औषधी देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महायुतीमध्ये भाजप (BJP) सोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागपुरातील नेत्या आणि नगरसेविका आभा पांडे यांनीच या प्राथमिक आरोग्य केंद्राची पोलखोल करत महापालिकेला घरचा आहेर दिला आहे. एबीपी माझाने जेव्हा या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन परिस्थिती पाहिली असता, गेले दोन महिने नर्स आणि कम्पाऊंडरच रुग्णांना औषध देत असल्याचे वास्तव समोर आले.
चक्क नर्स आणि कम्पाऊंडरकडून रुग्णांवर उपचार
देशातील कोरोना संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातील बहुतेक रुग्ण नवीन JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याने चिंता वाढली आहे. नवीन वर्षात पुन्हा कोरोना संसर्गाला वेग आल्याने प्रशासन अलर्टवर आहे. राज्यात एकीकडे सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असताना मात्र नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार समोर आला आहे. नागपुरातील शहीद चौकात महानगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रात गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून डॉक्टरंच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. परिणामी, या उपचार केंद्रांवर चक्क नर्स आणि कम्पाऊंडर च्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्याची नामुष्की ओढवली आहे.
एकीकडे देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय. राज्यात गुरुवार 4 जानेवारी रोजी कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. तर 171 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीये. असे असतांना या आरोग्य केंद्रांवरील चित्र भयावह असून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप महायुतीमध्ये भाजप सोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागपुरातील नेत्या आणि नगरसेविका आभा पांडे यांनी केला आहे.
जेवढे रुग्ण आम्हाला झेपतात, तेवढ्यांवर उपचार
नागपुरातील शहीद चौकात असलेले महानगर पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे या परिसरातील सर्वसामन्यांसाठी फार महत्वाचे आहे. या उपचार केंद्रात अगदी माफक दरात रुग्णांवर उपचार केले जातात. दररोज या केंद्रांवर दिवसाला 30-40 रुग्ण उपचार घेत असतात. मात्र गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या आरोग्य केंद्रावर डॉक्टर्सच उपस्थित होऊ शकले नाही. स्थानिक रुग्णांनी देखील या विषयी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार मिळत नसल्यामुळे महागड्या डॉक्टर्स कडे जाण्याची वेळ येत असल्याची अनेक तक्रारी दिल्या. मात्र त्यावर कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या उपचार केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चक्क नर्स आणि कम्पाऊंडर च्या माध्यमातून उपचार करण्याची नामुष्की ओढवली आहे. या बाबत येथील नर्सला विचारणा केली असता, डॉक्टर नसल्यामुळे आमचाही नाइलाज आहे. आमच्या ज्ञानाप्रमाणे जेवढे रुग्ण आम्हाला झेपतात, तेवढ्यांवर आम्ही उपचार करतो. इतरांना उपचार न देता इतर शासकीय रुग्णालयात पाठवतो. असे येथील नर्स म्हणाल्या.