Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Jalgaon train Accident जळगावहून एक्सप्रेस निघाली होती, परंडा स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात, तशा ठिणग्या उडाल्या होत्या.
जळगाव : जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात (train accident) घडल्याचे समोर आले असून 6 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वेच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती आहे. याबाबत जळगावचे (Jalgaon) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना घटनेची माहित दिली. मी जिल्हाधिकारी (Collector) यांच्यासोबत बोललो असून रेल्वे स्थानकावर ट्रेन उभी होती तेव्हा लोहमार्ग क्रॉस करताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते, मात्र हे निश्चित नाही, असे मंत्री पाटील यांनी म्हटले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव
जळगावहून एक्सप्रेस निघाली होती, परधाडे स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात, तशा ठिणग्या उडाल्या होत्या. तेव्हा ट्रेनमधील एका प्रवाशांने आग लागली, आग लागली असं बोलल्यामुळे रेल्वेतील काही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजुने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेस येत होती, त्या एक्सप्रेसखाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंदाजे 9 ते 10 लोकं रेल्वेखाली चिरडल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे प्रशासना आता घटनास्थळी पोहोचलं असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आल आहे. तर, जळगावच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
6 ते 8 जण जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी 8 रुग्णावाहिका पोहोचल्या असून जिल्हा वैद्यकीय अधिकारी व रेल्वेचे अधिकारीही मदतीसाठी प्रयत्नशील आहेत. येथील तीन रुग्णालयांना आपण सक्रीय राहण्याचे सांगितले असून ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येत आहे. प्रांताधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 ते 8 जण रेल्वेखाली आल्याची माहिती आहे.