Central Jail Nagpur : मध्यवर्ती कारागृहात लवकरच अत्याधुनिक सीसीटीव्ही; गैरप्रकाराच्या घटनांवर बसणार आळा!
CCTV मुळे कारागृहातील कैद्यांपर्यंत होणारी अमली पदार्थ, मोबाइल तस्करीवर तसेच अनुचित घटनांवर आळा बसणार आहे. कारागृहात बंदिस्त कैद्यांच्या हालचालीवरही प्रशासनाची करडी नजर ठेवणे शक्य होणार आहे.

Central Jail Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची क्षमता आणि सुरक्षा तसेच कैद्यांच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आणखी सीसीटीव्ही कॅमेर्याची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेता जिल्हा नियोजन मंडळाकडे (डीपीसी) 300 सीसीटीव्हीसाठी (CCTV) प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी सुसज्ज असे नियंत्रण कक्षही तयार करण्यात येणार आहे. मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून अलिकडेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करुन जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर केला. या प्रस्तावात 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या कारागृहात 150 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, हे कॅमेरे अपुरे पडतात. त्यामुळे अधिकच्या कॅमेर्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून ते कैद्यांच्या बॅरेकपर्यंत तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच कारागृहात सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण कारागृह परिसर कॅमेर्यांच्या निगराणीखाली येणार आहे. या कॅमेर्यांमुळे कारागृहातील कैद्यांपर्यंत होणारी अमली पदार्थ तसेच मोबाईल फोनची तस्करी अशा गैरप्रकारांना आळा बसणार आहे. तसेच कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या हालचालीवरही प्रशासनाची करडी नजर ठेवणे शक्य होणार आहे. यासंदर्भात कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकार्यांनी (Nagpur Collector) प्रतिसाद देत सकारात्मकता दर्शवली. लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कारागृहात गांजा अन् मोबाईल
सप्टेंबर 2022 मध्ये मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी जवळ गांजा आणि 15 मोबाईल फोन, बॅटरी सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या चौकशी आदेशात कारागृहात बंद पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले होते. चौकशीनंतर 6 आरोपींना अटक, 2 पोलिसांना निलंबित तर 3 पोलिसांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नुकतेच कोर्टातील पेशीवरुन परतलेल्या एका कैद्याकडे एक मोबाईल फोन आणि तीन बॅटरी आढळून आल्या होत्या. अशाप्रकारेच गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येत कारागृहात तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचेही अनेकवेळा उघडकीस आल्यावरही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नव्हती हे विशेष.
प्रस्ताव डीपीसीकडे...
मध्यवर्ती कारागृहात सध्या 150 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, ते अपुरे पडतात. जिल्हा नियोजन मंडळाकडे 300 सीसीटीव्हीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा सुद्धा झाली. लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.
ही बातमी देखील वाचा...
नागपूर जिल्हा परिषदेतील पेन्शन घोटाळ्याची व्याप्ती वाढली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
