(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : MBBS प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर नागपुरात 52 लाखांची फसवणूक
मुलीला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने MBBS प्रवेशासाठी 52 लाख रुपये दिले गेले. प्रवेश मिळाला नाही. त्यांनी रक्कम परत मागितली. मात्र, पैसेही परत मिळाले नसल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दिली.
Nagpur Crime News : तमिळनाडूच्या तीन ठगांनी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, अशी थाप मारून नागपुरातील पालकाची 52 लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आला. एम. विजय कुमार (वय 46), अन्नू सॅम्युअल (वय 41) आणि जेकब थॉमस (वय 54) सर्व रा. वेल्लूर, तमिळनाडू अशी आरोपींची नावे आहेत.
झिंगाबाई टाकळी, सुमितनगर येथील ओमप्रकाश वंदेवार (वय 41) यांच्या मुलीने नीटची परीक्षा दिली. गुण कमी पडल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळू शकत नव्हता. काही लोकांनी एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी या तीन ठगबाजांची नावे सांगितले. फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधला. प्रत्यक्षात वेल्लूरला जाऊन चर्चा केली. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लूर येथे मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन मिळाले. 80 लाख रुपये लागतात, परंतु परिचयातून आल्याने 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले गेले. वंदेवार यांनी एक लाख रुपये दिले. यानंतरची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली. 52 लाख रुपये दिले गेले. प्रवेश मिळाला नाही. त्यांनी रक्कम परत मागितली. मात्र, पैसेही परत मिळाले नसल्याने त्यांनी पोलिसात (Nagpur Police) तक्रार दिली.
इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू
शहरात घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत सदरच्या मंगळवारी बाजार परिसरातील निर्माणाधीन इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ठाकुरदास जितम सक्सेना (वय 25) रा. खेरागड, आगरा असे मृताचे नाव आहे. मंगळवारी परिसरात रायसोनी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ठाकुरदास यांच्यासह इतर मजूर तेथे कामाला होते आणि इमारतीच्या चौथ्या माळ्यावर झोपले होते. रात्री सर्व मजुरांनी एकत्र जेवण केले. रात्री 10.30 च्या सुमारास मोसम प्रभुदयाल सिंह नावाच्या मजुराने खोलीचे दार बंद करण्यापूर्वी सर्व मजूर जागेवर आहेत किंवा नाही हे तपासले असता ठाकुरदास दिसला नाही. त्याने इतर मजुरांना त्याच्याबाबत विचारपूस केली, मात्र कोणालाही माहिती नव्हती. त्याचा शोध घेतला असता तो पहिल्या माळ्यावर पडून असल्याचे दिसले. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
ज्वेलर्सचे दुकान फोडले
शहरात घडलेल्या गुन्हेगारीच्या एका घटनेत अज्ञात आरोपीने सराफाचे दुकान फोडून दीड किलो चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 30 हजार रुपयांच्या मालावर हातसाफ केला. ही घटना यशोधरानगर ठाण्यांतर्गत यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी सराफा व्यवसायी संतोष मधुकर हिरुळकर (वय 45) रा. संताजी चौक, यशोधरानगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. हिरुळकर यांचे भिलगावात श्री ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. सायंकाळी ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले. मध्यरात्रीनंतर आरोपीने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील चांदीच्या तोरड्या, करदोळे, चाळ असे दीड किलो चांदीचे दागिने व सोन्याच्या चार अंगठ्यांसह 1 लाख 30 हजार रुपयांचा माल लंपास केला. सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.