Nagpur News: मनपाच्या आवज-जावकमधील तक्रारी पडूनच!
शहरातील शेकडो फ्लॅट सिस्टीममध्ये बिल्डरकडून डीओडीमध्ये अनेक बदल करुन फ्लॅटची संख्या वाढविण्यात आली. नव्या नकाशांना नासुप्रकडूनही "संबंधां'मुळे मंजुरी मिळाली. मात्र, याचा त्रास राहणाऱ्यांना होत आहे.
नागपूरः नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी मनपाच्यावतीने झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले. मात्र हे केंद्र देखील पांढरा हत्ती ठरतच आहे. यामध्ये आतापर्यंत प्राप्त 226 तक्रारी सोडविल्याचा दावा मनपाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. तरी, विविध झोन स्तरावर लिखित स्वरुपात दाखल तक्रारी आवाज-जावक विभागात अनेक महिन्यांपासून पडून असल्याची माहिती आहे.
सिवेज, पाणी, स्वच्छता, पथदिवे या व्यतिरिक्त सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबियांच्या तक्रारी मनपामध्ये पडून असल्याची माहिती आहे. बिल्डरने सोसायटी निर्मिती करुन दिली नसल्याने नागरिकांना सिवेज, स्वच्छता आदी समस्यांना अनेक वर्षांपासून तोड द्यावे लागत आहे. यासंदर्भातील तक्रार मनपामध्ये दिल्यावर मनपाचे अधिकारी फोन करुन ही समस्या आमची नसून आम्ही काहीच करु शकत नसल्याचे सांगतात.
झोनमधील नागरी समस्या निवारण केंद्र हे सकाळी 7 ते रात्री 8 वाजतापर्यंत सुरू असून पावसाळा सुरू झाल्यानंतर सदर कक्ष पूर्ण वेळ 24 तास कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या तक्रारी आपल्या संबंधित झोन कार्यालयात नोंदवून मनपाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेल्पलाईनच ठरली हेल्पलेस!
करोना काळात औषधी, बेड तसेच लसीकरण केंद्रांसंबंधीत तक्रारींसाठी मनपाच्या हेल्पलाईनवरील क्रमांकावर फोन केल्यावर उडवाउडीवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. तसेच या हेल्पलाईनवर कॉल करुन फक्त 'टाइमपास' झाला असून मदत मिळाली नसल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.
वाचाः व्हिडीओ व्हायरल होताच, दोन कॉन्स्टेबल निलंबित
बिल्डरकडून सिवेज लाईन वरील जागेचीही विक्री
मंडळवारी झोन अंतर्गत असलेल्या एका 15 वर्षांवरील जुन्या एका नामांकित बिल्डरच्या फ्लॅट स्किममध्ये बिल्डरने तीनवेळा डीओडी (डिड ऑफ डिक्लेरेशन) मध्ये बदल केले. तसेच पार्किंग परिसरात नवीन फ्लॅटस्किमची मंजुरी एनआयटीकडून मिळवली. त्यानंतर उर्वरित सिवेजलाईन वरील जागा ग्राऊंड फ्लोअरवर फ्लॅट असलेल्यांना अतिरिक्त शुल्क घेऊन विकली असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या संदर्भात बिल्डरकडेही लिखीत तक्रार दिल्यावर काही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेकडे लिखित तक्रार देऊन 6 महिन्यांवर कालावधी उलटूनही मनपाकडून काही प्रत्युत्तर आले नसल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले.
वाचाः वाघिणीच्या दातानेच घेतला नवजात बछड्याचा जीव; वन्यप्रेमींमध्ये हळहळ
सिवेज लाईनच्या सर्वाधिक तक्रारी
शहरातील विविध भागात अनेक जुने प्रकल्प आहेत. यामध्ये अतिरिक्त फ्लॅट उभारुन याची सिवेज लाईनही कमी क्षमता असलेल्या जुन्या सिवेज लाईनमध्ये जोडण्यात आली आहे. परिणामी काही वर्षांनंतर ही लाईन दर दुसऱ्या दिवशी चोक होत असते. मात्र मनपाकडे या संदर्भात तक्रार केल्यावर ही तुमची वैयक्तीक समस्या असल्याचे सांगण्यात येते. बिल्डरने या लाईनमध्ये बाजूच्या बिल्डिंगची लाईन जोडली असल्याचे सांगितल्यावर मनपा अधिकाऱ्यांकडून नागपूर सुधार प्रन्यासने बिल्डिंगली मंजुरी दिली असल्याने त्यांच्याकडे तक्रार करा असा तोंडी सल्ला देण्यात येतो. त्यामुळे सोसायट्यांच्या तक्रारी कुठे सोडवाव्या असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.