खड्ड्यांमुळे वाडा-भिवंडी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, संतप्त नागरिकांचा रास्तारोको
दोन दिवसांपूर्वी डॉ.नेहा शेख आणि काल रामप्रसाद गोस्वामी यांचा अपघातात मृत्यू झाला होता. वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यांमुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.
पालघर : वाडा-भिवंडी मार्गावर कुडूस येथे जिजाऊ संस्था आणि नागरिकांचा गेल्या आठ तासांपासून रास्ता रोको सुरु आहे. वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यांमुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिक संतप्त झाले असून जिजाऊ संस्थेच्या महिलांसह नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत.
दोन दिवसांपूर्वी डॉ.नेहा शेख आणि काल रामप्रसाद गोस्वामी यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता सर्व संतप्त नागरिक कुडूस येथे रस्त्यावर जमले आहेत. सुप्रीम कंपनीच्या अंतर्गत हा रस्ता येत असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत.
पोलिसांनी मध्यस्थी करुन आंदोलनकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. वाडा-भिंवडी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
डॉ नेहा आलमगीर शेख या 23 वर्षीय तरुणीचा या मार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. दूगाड फाटा येथून स्कूटीवरुन भावासोबत घरी परतत असताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने मागे बसलेली नेहा खाली पडली आणि माघून येणाऱ्या ट्रकने नेहाला चिरडले. नेहाच पुढील महिन्यात लग्न असल्याने ती ठाणे येथे लग्नाचं सामान घेण्यासाठी गेली होती. काल पुन्हा वाडा भिवंडी रोडवर खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने 60 वर्षीय रामप्रसाद गोस्वामी पादचाऱ्याला उडवले.