Mansukh Hiren Case | मनसुख हिरण यांच्या हत्येच्या कट रचण्याच्या बैठकीला विनायक शिंदे आणि सचिन वाझे उपस्थित
सचिन वाझेंनी मुख्य सुत्रधाराशी मोबाईलवर संपर्क साधल्याचेही पुरावे. एनआयएचा मुंबई सत्र न्यायालयात मोठा दावा
मुंबई : मनसुख हिरण यांच्या हत्येची योजना ज्या बैठकीत आखण्यात आली, त्या बैठकीला सचिन वाझे आणि विनायक शिंदे हे दोघेही उपस्थित होते. असा दावा मंगळवारी राष्ट्रीय तपासयंत्रणा (एनआयए) च्यावतीने विशेष एनआयए न्यायालयात करण्यात आला. तसेच वाझे यांनी हे कारस्थान रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराला मोबाईलवरून फोनही केला असल्याची माहिती एनआयएने न्यायालयाला दिली. त्यामुळे हे कट कारस्थान आणि गुन्ह्यामागील हेतूचा जवळपास उलगडला झाल्याचंही एनआयएनं विशेष न्यायालयाला सांगितलं.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसुख हिरण यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांना अटक करण्यात आली होती. मागील आठवड्यातच शिंदे आणि गोर यांचा ताबा एटीएसकडनं एनआयएला देण्यात आला. मंगळवारी त्यांची कोठडी संपत असल्यानं त्यांना विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं.
हिरण यांच्या हत्येचे कारस्थान रचलं त्या ठिकाणी वाझे आणि शिंदे उपस्थित होते. तसेच त्यांच्याकडनं सात सिमकार्ड, काही मोबाईल आणि सीपीयूही जप्त करण्यात आले आहेत. त्यातील सिम कार्ड आणि मोबाइल फोन शिंदे हे यांच्याकडून जप्त करण्यात आलेत. त्याबाबत आरोपींकडे चौकशी करणे आवश्यक असल्याचं एनआयएकडून विशेष सरकारी वकील सुनील गोंसलवेस यांनी न्यायालयात सांगितलं. तसेच तपास करताना कागदाचा एक तुकडाही सापडला असून त्यात 14 मोबाइल नंबर लिहिलेले आहेत. त्यापैकी पाच फोन नंबर हे वाझे यांना देण्यात आले होते. तसेच एक मोबाईल फोनही वाझे यांना देण्यात आला होता, ज्याचा वापर हिरण यांना ठार मारण्याचा कट रचणार्याशी संपर्क साधताना वाझे यांना केला होता. त्यामुळे हिरण यांच्या हत्येमागील कारस्थान आणि हेतू उलगडण्यात तपास यंत्रणा जवळपास असल्याची माहिती गोंसालवेस यांनी न्यायालयाला दिली.
सिमकार्ड मिळवून देण्याशिवाय शिंदे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, तसेच त्यांना या आधीच नऊ दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं होते. त्यामुळे त्यांच्या अधिक कोठडीची गरज नसल्याचा दावा आरोपी शिंदे आणि गोर यांच्यावतीने कोर्टात करण्यात आला. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने शिंदे आणि गोर यांच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.