'मराठी बाणा' कुणाचा? अशोक हांडेंचा शेमारुविरोधात 200 कोटींचा दावा; हायकोर्टात मंगळवारी फैसला
'शेमारू' या कंपनीने आपल्या नव्या मराठी चॅनेलच्या नावात मराठी बाणा वापरल्याने ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करत अशोक हांडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर मराठी बाणा हा सर्व प्रचलित शब्द असून या शब्दातून मराठी भाषेचं तिच्या अस्मितेचं दर्शन होतं, असं शेमारुनं न्यायालयात म्हटलं आहे.
मुंबई : 'मराठी बाणा' या शब्दावरुन लोककलाकार अशोक हांडे आणि शेमारु कंपनीत सुरु असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी आपला फैसला सुनावणार आहे. संगीताच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचं अवघ्या जगाला दर्शन घडवणाऱ्या दिग्दर्शक, गायक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सर्वश्रुत आहे. मराठी बाणा या नावासाठी अशोक हांडे यांनी ट्रेडमार्क घेतले आहे. असं असतानाही 'शेमारू' या कंपनीने आपल्या नव्या मराठी चॅनेलच्या नावात मराठी बाणा वापरल्याने ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करत अशोक हांडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मात्र मराठी बाणा हा सर्व प्रचलित शब्द असून या शब्दातून मराठी भाषेचं तिच्या अस्मितेचं दर्शन होतं. अनेकदा हा शब्द स्वाभिमान दाखवण्यासाठीच वापरला जातो. एवढेच काय तर 19 व्या शतकापासून मराठी बाणा या शब्दाचा वापर होत असून अनेक ऐतिहासिक पुस्तके, शालेय पुस्तके, कादंबऱ्यांमध्येही या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे 'मराठी बाणा' या शब्दावर कुणाचाही वैयक्तिक दावा असू शकत नाही, असा युक्तिवाद शेमारु कंपनीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.
शेमारु विरोधात अशोक हांडे यांनी माहीम पोलीस ठाण्यात 26 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने हांडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या कंपनीने मराठी बाणा हे नाव तात्काळ हटवावं तसेच नुकसान भरपाई पोटी आपल्याला 200 कोटी रुपये देण्याचं उच्च न्यायालयाने कंपनीला आदेश द्यावेत, अशी हांडे यांनी या याचिकेत मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली असून मंगळवारी यावर उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे.
शेमारुच्यावतीने बाजू मांडताना उच्च न्यायालयाला सांगण्यात आलं की, मराठी बाणा ही एक भावना आहे. कोणीही मराठीच्या स्वाभिमानसाठी हा शब्द वापरु शकतो. मराठी वाङमय भाषेचा इतिहास, यांबद्दल बोलताना या शब्दाचा सर्रासपणे वापर करण्यात येतो. तसेच अनेक वृत्तपत्र, सोशल मीडिया, टीव्ही वाहिन्यांवरील शोवर सुद्धा 'मराठी बाणा' या नावाचा खुलेआम वापर करत कार्यक्रम केले जातात. त्यामुळे याचिकाकर्त्यांद्वारे या शब्दांत आक्षेप घेणं चुकीचे आहे. तेव्हा आता मंगळवारी उच्च न्यायालय काय फैसला देणार याकडे महाराष्ट्रचं लक्ष लागून राहिलं आहे.