विकासकामांसाठी वृक्षतोड अनिवार्य, आरेतील वृक्षतोडीला नितीन गडकरींचं समर्थन
तिरेही तलाक विरोधी कायदा बनवून सरकारने मुस्लीम महिलांना मोठा दिलासा दिली आहे. तर कलम 370 मधील तरतूदी हटवून सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये विकास करण्यास सुरूवात केली आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं.
मुंबई : देशातील मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारने घेतलेल्या कलम 370, तिहेरी तलाक यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांचं समर्थन केलं. तसेच मोदी सरकारच्या इतर विकासकामांबद्दलही गडकरी यांनी माहिती दिली.
विकासकामांसाठी वृक्षतोड अनिवार्य
वृक्षारोपणाला महाराष्ट्र सरकारने खूप महत्त्व दिलं आहे. इथे सुरु असलेला हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. विकासकामांसाठी काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य आहे. मात्र त्याची भरपाई म्हणून नवे वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि विकासकामे यांचा समतोल राखणं महत्त्वाचे आहे. माझ्या काळात जेव्हा मी वांद्रे-वरळी सीलिंकचं काम सुरु केलं होतं, तेव्हाही किती याचिका आल्या, किती विरोध झाला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की, 400 कोटींचं काम 1800 कोटींवर गेलं. त्यामुळे आज टोलचा भुर्दंड येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे किती विरोध करायचा हे ठरवा, असा सल्ला गडकरींनी दिला.
तिहेरी तलाक विरोधी कायदा बनवून सरकारने मुस्लीम महिलांना मोठा दिलासा दिला आहे. तर कलम 370 मधील तरतूदी हटवून सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये विकास करण्यास सुरूवात केली आहे. तर UAPA मधील सुधारणाही देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गरजेची होती, असं गडकरींनी म्हटलं.
कायदा तोडू नका, दंडाची भीती नाही
मोटर वेहिकल अॅक्टमधील सुधारणा ही लोकांकडून दंड वसूलीसाठी नाही. तुम्ही कायदा तोडू नका, मग तुम्हाला दंडाची भीती नाही. 100 रुपयांचा दंड हा 30 वर्षांपूर्वी ठरवला होता. आज 100 रुपयांची किंमत काय? त्यामुळे यात बदल होण्याची गरज होती, ज्याचा फायदा रस्ते सुरक्षेसाठी होणार आहे, अशा पद्धतीने गडकरींनी मोटर वेहिकल अॅक्टचं समर्थन केलं.
मोटर वेहिकल अॅक्टमध्ये सुधारणा हे देखील केंद्र सरकारचं एक मोठ पाऊल आहे. जगात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये भारत आघाडीवर आहे. त्यामुळे कायदे कठोर करणं आवश्यक आहे. 14 हजार कोटींची गुंतवणूक करून अपघातप्रवण असे 'ब्लॅक स्पॉट' हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक दंडाची रक्कम वाढवली आहे.
ई-चलानमुळे बोगस परवाने मोठ्यासंख्येनं समोर आले आहे, असं गडकरींना सांगितलं. तसेच ई-चलानमुळे पारदर्शकता वाढली आहे. माझ्या नावावर असलेली गाडी वांद्रे-वरळी सीलिंकवर अतिवेगात चालवल्याने मलाही ई चलन आलेलं आहे, जे मी भरलं आहे. तर व्ही. के सिंग यांनाही चलन आलं आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्यापर्यंत सर्वांनाच चलन येतं, कायदा सर्वांना समान आहे, असंही, अंस गडकरी यांनी सांगितलं.