एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तिच्या' जिद्द आणि मेहनतीला सलाम, अंधत्वावर मात करुन डॉक्टर!
नालासोपारा: जिद्द आणि प्रचंड मेहनत यांच्या जोरावर आपल्या अंधत्वावर मात करीत डॉ. कृतिका पुरोहित हिने आपले स्वप्न साकार केले आहे. अंधत्वाचे कारण देत तिला मुख्य प्रवाहात नाकारणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढा देत कृतिकाने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. फिजिओथेरपीसारख्या विद्याशाखेची पदवी प्राप्त करून, महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलची रजिस्टेशन मिळणारी कृतिका ही देशातली पहिली अंध व्यक्ती ठरली आहे.
डोळ्याच्या नसेला इजा पोहचल्याने (ऑप्टिकल नर्व्ह डॅमेज) वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी, इयत्ता तिसरीत असताना कृतिकाला दृष्टी गमवावी लागली. दृष्टी गमावल्यानंतर घरच्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. यानंतर करायचं काय? मुंबईतील वांद्रेच्या एका इंग्रजी शाळेत कृतिका शिक्षण घेत होती. पण अचानक दृष्टी गमवावी लागल्यानं पुढे तिच्या करिअरविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला.
दरम्यान, नॅशनल असिस्टंट फॉर द ब्लाईंड (नॅब)च्या मदतीने कृतिकाने मुंबई येथील डीपीएम स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. दहावी पास झाल्यानंतर तिला अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठीही कॉलेज व्यवस्थेबरोबर संघर्ष करावा लागला. कारण सायन्सच्या प्रॅक्टिकल परिक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी त्यातून मार्ग काढण्याचं कॉलेज व्यवस्थापनानं ठरवलं आणि कृतिकाला अखेर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
बारावीनंतर कृतिकाला फिजिओथेरपी या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा द्यायची होती. मात्र, अंध असल्याने तिला सीईटीसाठी प्रवेश नाकारण्यात आला. त्या विरोधात कृतिकाने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. सीईटीत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत कृतिका पहिल्या दहात आली, तर तिला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा, असा निर्णय कोर्टनं दिला. कृतिकाने सीईटी परीक्षेत 121 गुण मिळवत दिव्यांगांच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला.
सीईटीमध्ये मदतनीसाच्या साह्याने तिने परीक्षेत यश संपादन केले. मात्र, फिजिओथेरपी या अभ्यासक्रमात लेखी व प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचा समावेश असल्याने तिला पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला. या विरोधात कृतिकाने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावेळीही न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय देत तिला प्रवेश दिला जावा, असे आदेश दिले. त्यानंतर तिने मुंबई येथील सेठ जीएस मेडिकल महाविद्यालयातून फिजिओथेरपी हा चार वर्षांचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणी मिळवत पूर्ण केला. पुढे सहा महिने या महाविद्यालयात तिने इंटर्नशिप पूर्ण करून बॅचलर इन फिजिओथेरपी ही पदवी प्राप्त केली. सध्या ती एका खासगी रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट म्हणून ऑब्जर्वर म्हणून काम करत आहे.
अंध आणि दिव्यांगांमध्ये डॉक्टर बनणारी कृतिका पहिली जरी नसली तरी ती महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडिया मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून रजिस्टर होणारी, देशातील महिला डॉक्टर बनण्याचा मान मिळाला आहे. कृतिकाच्या या अभतपूर्व यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement