ठाण्यातील महापौर कार्यालयात शिवसेना-राष्ट्रवादी भांडणाचा अंक दुसरा
ठाण्यात आधी रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आता लसीकरणाच्या मुद्यावरून या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली.
ठाणे : ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद आता विकोपाला गेल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कारण आज लसीकरणाच्या श्रेयवाद याचा दुसरा अंक महापौर कार्यालयात बघायला मिळाला. कळवा-खारीगाव येथे आयोजित केलेल्या महालसीकरण शिबिरात राष्ट्रवादीवर महापौर नरेश म्हस्के यांनी ‘ लसीकरणासाठी लागणारा दहा लाखांच्या खर्चाचा भार आम्ही उचलला होता’ अशी टीका केली होती. या टीकेला आज राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, गटनेते नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे पालिकेत जाऊन महापौरांना 20 लाख रुपयांचा धनादेश देण्याचा प्रयत्न केला. त्या पैशात नगर विकास मंत्री यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात लसीकरण शिबिर घेण्याची तयारी राष्ट्रवादीने महापौरांना सांगितली. मात्र त्यानंतर आनंद परांजपे आणि नरेश म्हस्के यांच्यात प्रचंड शाब्दिक चकमक उडाली
कळव्यात आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण महोत्सवाच्या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे लावण्यात आलेले बॅनर्स फाडण्यात आले होते. हे बॅनर्स शिवसेनेच्या नगरसेवकांनी फाडले असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवारी शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी याचा जाब विचारण्यासाठी थेट महापौरांच्या दालनात पोहचले. बॅनर्स शिवसेनेच्या नगरसेवकांनी फाडले असून आमच्याकडे याचे पुरावे असल्याचे परांजपे यांनी महापौरांना सांगितले.
कळवा-मुंब्रा हा विभाग गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघात येत असून शिष्टाचार प्रमाणे त्यांचे नाव टाकणे देखील आवश्यक असल्याचा मुद्दा राष्ट्रावादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर कोपरी पाचपाखाडी आणि ठाणे शहर या दोन मतदार संघात लसीकरण मोहिमेची परवानगी द्यावी आणि शिवसेनेच्या म्हण्याप्रमाणे मंडप आणि इतर खर्च हे कार्यकर्ते उचलत असतात असल्याने आम्ही मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा वैयक्तिक 20 लाखांचा धनादेश आणि निवेदन आणले असल्याचे आनंद परांजपे यांनी महापौरांना सांगतले.यावर महापौर नरेश म्हस्के प्रचंड संतापले. महापौरांनी धनादेश न स्वीकारता आपण गटनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्याशिवाय कोणाला ओळखत नसल्याचा पवित्रा महापौरांनी घेतला. त्यानंतर महापौर आणि आनंद परांजपे यांच्यामध्ये प्रचंड भांडण झाल्याचे बघायला मिळाले. महाविकास आघाडी मध्ये एकत्र असून देखील या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. अखेर विरोधी पक्षनेत्यांनी निवेदन दिल्यावर या वादावर अखेर पडदा पडला.