(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहाय्यक आयुक्त पिंपळे हल्ला प्रकरण; आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
Thane News : ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी अमरजीत यादव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
Thane News : मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी अमरजीत यादव याला शनिवारी कासारवडवली पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजार केलं. यावेळी ठाणे न्यायालयाने यादव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अटकेतील आरोपी अमरजीत यादव याला कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयानं दिली होती. शनिवारी कोठडीची मुदत संपल्यानं पुन्हा ठाणे न्यायालयात हजार केल्यानंतर पोलिसांच्या पोलीस कोठडीवर आरोपीचा तपास पूर्ण झाला असून त्यानं गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू हाही पोलिसांनी जप्त केल्यानं ठाणे न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी अमरजीत यादव याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी अमरजीत यादव याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, प्राणघातक हल्ला करणं अशा कलमांतर्गत नोंद करण्यात आलेली होती.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली होती. फेरीवाल्याच्या हल्ल्यात ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या गंभीर जखमी झाल्यात. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.
भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, "मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे." यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे देखील उपस्थित होते. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असतं. मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे, जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतोय. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतायत. न्यायालय देखील त्यांचं कर्तव्य बजावेल, अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. कल्पिता पिंपळे यांच्या कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आलं. तसेच सरकार खंबीरपणे पाठीशी उभं आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळे यांना दिली आहे.