दादर स्मशानभूमीत कोविड मृतदेहांचं दहन करण्यास स्थानिकांचा विरोध
मुंबईत कोविड मृतदेहांचं दहन करणाऱ्या स्मशानभूमीवर ताण वाढला आहे. दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनीवर याचा परिणाम होताना पाहायला मिळत आहे.
मुंबई : कोरोना बाधितांसोबतच कोरोनामुळे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. याचा परिणाम आता शहरातील स्मशानभूमीवर होताना दिसत आहे. सातत्यानं क्षमतेपेक्षा जास्त कोविड मृतदेहांचं दहन केल्यानं दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. मुंबईतल्या पहिल्या कोविड मृतदेहाचं दहन करणाऱ्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आतापर्यंत 150 पेक्षा जास्त मृतदेहांचं दहन करण्यात आलंय. या परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने याचा धोका त्यांना होऊ शकतो. त्यामुळे कोविड रुग्णांच्या मृतदेहाचं दहन दुसरीकडे करण्याची मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे.
एकीकडे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढतेय. तर दुसरीकडे कोरोनामुळे मृतांचा आकडाही वाढत चाललाय. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर तातडीनं अंत्यविधी होणं गरजेचं असतं. मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमधल्या विद्युतदाहिनीत सध्या मोठ्या संख्येनं कोविड मृतदेह दहनासाठी आणले जातायेत. मात्र, आता क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह रोज दहन होत असल्यानं या स्मशानभूमीवरचा ताण वाढलाय. त्यामुळे याठिकाणचं कोविड मृतदेहांचं दहन थांबवां, असं पत्र येथील नगरसेविका आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाला दिलंय.
शिवाजी पार्क स्मशानभूमी मुंबईतल्या पहिल्या कोविड मृतदेहावर अंत्यविधी करणाऱ्या दादर स्मशानभूमीत काम करणारा पालिकेचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलंय. आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 150 कोविड मृतदेहांवर विद्युतदाहिनीत अंत्यविधी करण्यात आले आहेत. या स्मशानभूमीला लागुनच रहिवासी वस्ती आहे. सातत्यानं कोविड मृतदेह इथे आणले जात असल्यानं या परिसराला संसर्गाचाही धोका आहे.
पुणेकरांनो जेवण ऑनलाईन मागवताना सावधान! नामांकित हॉटेलच्या नावाने सोशल मीडियावर बनावट जाहिराती
दादरच्या आजुबाजूच्या परिसरातूनच नाही तर संपूर्ण मुंबईतूनही याठिकाणी कोविड मृतदेह मोठ्या संख्येनं येतात. विद्युतदाहिनीच्या चिमणीतून सतत निघणाऱ्या धुरानं येथील इमारती काळवंडल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळे दादर स्मशानभूमीत आता कोविड मृतदेह आणू नयेत. इतर भागातील स्मशानभूमीचाही वापर करावा अशी रहिवाशांची मागणी आहे. कोरोनानं बळी घेतलेल्यांची संख्या वाढतेय. रुग्णालयं, खाटा अपुऱ्या पडतातच आहेत. मात्र, स्मशानभूमींची क्षमता संपणं ही येणाऱ्या भयंकर संकटाची नांदी असू नये एवढंच.
Covid 19 मृतदेह दादर स्मशानभूमीत आणण्यास स्थानिकांचा विरोध