एक्स्प्लोर
लोहमार्ग पोलिसाला तिकीट तपासनीस महिलेने पोलीस ठाण्यात डांबून ठेवले
डाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तिकीट तपासणी करणाऱ्या महिलेने दीड ते दोन तास डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : वडाळा लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्याला रेल्वेच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (डीआरए) कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने चावा घेतल्याची घटना अजून ताजी आहे. तोवर याच पोलीस ठाण्यात अजून एक धक्कादायक घटना घडली आहे. याच वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तिकीट तपासणी करणाऱ्या महिलेने दीड ते दोन तास डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही गुन्ह्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येते. वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी श्याम शेळके एका आरोपीला सीएसएमटीला नेते होते. परंतु सीएसएमटी स्थानकातील तिकीट तपासणीस रुचिता घुले यांनी शेळके यांना तिकीट मागितले. शेळके यांनी ते जीआरपीचे कर्मचारी असून कर्तव्यावर असल्याचे सांगितले. यावर तिकीट तपासनीस घुले यांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांना कार्यालयात नेले आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत बसवले. पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्यानंतर शेळके यांनी त्यांचे वरिष्ठ राजेंद्र पाल यांना याबाबत फोनवरून माहिती दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाशी बोलून मध्यस्थी केली. त्यानंतर शेळके यांची सुटका करण्यात आली. वडाळा जीआरपी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबाबत अहवाल पाठवला आहे. रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र कांबळे यांना 48 तासात चौकशी करुन अहवाल देण्याचे सांगितले आहे. हा अहवाल आल्यावर संबंधित महिला तपासनीस रुचिता घुले यांच्यावर गुन्हा दाखल करायचा किंवा नाही हे ठरणार असल्याची माहिती राजेंद्र पाल यांनी दिली आहे.
आणखी वाचा























