Baba Siddique Shot Dead: अचानक स्फोट झाल्याचा आवाज, सर्वत्र धुर अन् गोळ्यांचा आवाज, बाबा सिद्दीकी यांच्यावर कसा झाला हल्ला? वाचा संपूर्ण घटनाक्रम
Baba Siddique Shot Dead: तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशी घडली, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल(शनिवारी) गोळीबार झाला.या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique)यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आज बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान मारिन लाईन येथे दफनविधी होणार आहे.
घटना नेमकी कशी घडली? संपूर्ण घटनाक्रम
काल (शनिवारी) बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी रात्री 9 वाजेपर्यंत खेरवाडीतील त्यांच्या कार्यालयात होते. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास दोघेही एकत्र घरी जाण्यासाठी निघाले, पण अचानक झीशान सिद्दिकींना फोन आल्याने झीशान सिद्दीकी आधी कार्यालयातून खेरवाडीला जाण्यासाठी कार्यालयातून निघाले. झीशान सिद्दीकी गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनंतर बाबा सिद्दीकी नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटून बाहेर आले.
बाबा सिद्दीकी यांची गाडी ऑफिसपासून 100 मीटर अंतरावर उभी होती. लोकांना भेटत असताना बाबा सिद्दीकी यांची गाडी जवळच असताना अचानक कसला तरी स्फोटाचा आवाज आला. दसरा, देवीमातेचा उत्सव सुरू असल्याने प्रथम कार्यकर्त्यांना फटाके फोडले जात असल्याचे वाटले, परंतु आजूबाजूला देवी नसल्याने अचानक मोठा गोंधळ उडाला. त्या स्फोटामुळे धुराचे लोट परिसरात पसरले गेले आणि गोळ्या झाडल्याचा मोठा आवाज झाला. धुरामुळे लोकांना जोरात खोकला येऊ लागला आणि डोळ्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे लोकांना काय करावं हे समजत नव्हतं. बाबा सिद्दीकी यांचे कार्यकर्ते गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनातीन जण पळत असल्याचे दिसून आले.
त्यावेळी बाबा सिद्दीकी रक्ताने माखले होते. जवळच्या एका कार्यकर्त्याने तात्काळ बाबा सिद्धीकी यांना गाडीत बसवून लीलावती रुग्णालयात नेलं. छातीत गोळी लागल्याने बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. मात्र स्फोटानंतर झालेल्या धुराचा फायदा घेत गोळीबार करणारे फरार झाले.
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारावेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.