पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार आहे.
मुंबई : राज्यातील 3000 पेसा कर्मचाऱ्यांपैकी केंद्र सरकारच्या निधी कपातीमुळे 2000 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे संकट आले होते. हे संकट टाळण्यासाठी व प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक याप्रमाणे पेसा कर्मचाऱ्यांची 3000 पदे नियमित ठेवण्यासाठी,आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व पेसा कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने राज्यात जोरदार आंदोलन सुरू होते. अखेर पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार आहे.
आझाद मैदान येथे भर पावसात मागील महिन्यात झालेल्या आंदोलनानंतर आता पेसा मोबिलायझरची पदे कमी करू नये या मागणीसाठी दिनांक 4 ऑगस्ट पासून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या राळेगाव येथील कार्यालयासमोर पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मा. आदिवासी विकास मंत्री यांनी आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच संघटनेची संपर्क साधत मंत्रालयामध्ये आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके व ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे तसेच या दोन्ही विभागाचे प्रधान सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व पेसा मोबिलाईझर संघर्ष समितीच्या
वतीने डॉ.अशोक ढवळे, कॉ. मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, आ. विनोद निकोले, डॉ. अमोल वाघमारे, नासीर हाश्मी व पेसा मोबिलाईझर प्रतिनिधी यामध्ये प्रतीक्षा पाटील,सुरेश पवार, रविताबाई पाडवी, खुलनाबाई तुमराम, अर्चना पेंदाम, इंदिरा भोये आदी उपस्थित होते. सर्व 3000 पेसा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने पुरेसा निधी द्यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश येईपर्यंत 3000 पदे पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील व केंद्र सरकारचा पुढील निर्णय येईपर्यंत यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद आदिवासी विकास विभागाच्या वतीने केली जाईल असे या बैठकीच्या वेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
आजच्या या निर्णयाने राज्यातील 2000 आदिवासी महिला-पुरुषांचा रोजगार वाचला आहे तसेच आदिवासी भागातील पेसा कायद्याच्या अंमलबजावणी बाबत एक महत्वाचा सकारात्मक निर्णय झाला आहे. आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व पेसा मोबिलाईझर संघर्ष समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सुरुवातीपासून अजित अभ्यंकर, संगीता साळवे, उषा मुरखे, शंकर सिडाम, किरण गहला, अमोल मारकवार, राज बन्सोड, सुभाष पांडे, छाया जाधव, सुदाम ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?




















