ST Strike Update : 'संपात भाग घेतला म्हणून कोणतीही कारवाई करू नये', हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी; वाचा महत्वाचे मुद्दे
ST Strike top 10 highlights High Court Judgement : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी करण्यात आली आहे. आता अॅड सदावर्ते काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
ST Strike Update Mumbai Bombay High Court : एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. आज हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी करण्यात आली. कामगारांनी 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावं, असं कोर्टानं सांगितलं आहे. कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे भावूक झाले. निर्णय ऐकताच त्यांना आनंदाश्रू आवरणं कठिण झाल्याचं पाहायला मिळालं.
हायकोर्टाच्या निकालातील अत्यंत महत्वाचे मुद्दे
कामावर परतणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये - हायकोर्ट
संपात भाग घेतला म्हणून महामंडळानं कोणतीही कारवाई करू नये
या कारणासाठी जर कामगारांवर कारवाई आधीच केलेली असेल तर ती रद्द करण्यात यावी
ज्या कामगारांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आलेल्या होत्या त्यांनासुद्धा कारवाईतून दिलासा देण्यात यावा
महामंडळ यापुढे फौजदारी कारवाई करणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे - हायकोर्ट
संपाच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या त्या कर्मचाऱ्यांना बदल्या रद्द करून संपाआधी ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तिथेच त्यांचं परत पोस्टिंग करा
कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना 23 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात प्रतिदिन 300 रुपयाचा जाहीर भत्ता तातडीनं द्या
महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्माचाऱ्यांचा थकीत पीएफ कायद्यानुसार दिलेल्या कालावधीत त्वरित अदा द्या
कोविड काळात मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना चार आठवड्यात कायदेशीर भरपाई द्यावी
आम्हाला आशा आहे की, न्यायालयाने घेतलेला निर्णय कामगारही मान्य करतील आणि कामावर परततील
परंतु जे कामगार कामावर रूजू होणार नाही त्यांच्यावर कारवाईस महामंडळाला मुभा
आता गुणरत्न सदावर्ते काय भूमिका घेणार?
हायकोर्टाच्या निर्णयानंतर संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते, की न्यायालयाचा सविस्तर निकाल आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार. आता सदावर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या
ST Workers : कोणाच्या नादी न लागता ST कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर यावं, अन्यथा... : अनिल परब
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha