घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला
जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना लगावला.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवलं जातं. सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करु नका, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
दहीहंडी सणाबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. मात्र भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना लगावला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले. लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवलं जातं. सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असं राज ठाकरे म्हणाले.
तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान
मुंबई महापालिकेची तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका गृहित धरून सर्व तयारी केली आहे. विशेषत: सील इमारती आणि नो मास्क मोहिमेवर आमचं लक्ष असेल. मास्क न घातलेल्यांवर कारवाई तीव्र होणारच आहे. मात्र, हुज्जत घालणाऱ्या, अरेरावी करणाऱ्या क्लीनअप मार्शलविरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्यास अशा क्लीनअप मार्शलवरही कारवाई होणार आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. प्रत्येक क्लीनअप मार्शलची आणि वॉर्डची ओळख दर्शवणारा ठळक क्रमांक गणवेशावर दिला जाईल. त्यामुळे नागरिकांनाही तक्रार करणे शक्य होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
मनसेनं मध्यरात्रीच फोडली दहीहंडी तर भाजपचे राम कदम म्हणाले, दहीहंडी होणारच