(Source: Poll of Polls)
Shiv Sena : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदे गटात
Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आज ठाण्यातील टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या असताना दुसरीकडे रश्मी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आक्रमक महिला चेहरा असलेल्या मीनाताई कांबळी (Meena Kambli) यांनी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने नेते पदाची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर मीनाताई कांबळी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
मीनाताई कांबळी या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. महाविकास आघाडी सरकाच्या काळात शिर्डी संस्थानच्या विश्वस्त म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मातोश्री बचत गटाच्या त्या उपाध्यक्षा आहेत. त्यामुळे मीनाताई कांबळी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. महिलांमध्ये त्यांचा संपर्क आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, ही बाब ठाकरे गटासाठी चिंतेची ठरण्याची शक्यता आहे.
मीनाताई कांबळी या दक्षिण मुंबईत अधिक सक्रिय आहेत. मराठीबहुल भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी मीनाताई कांबळी यांची मदत होईल, असा होरा शिंदे गटाचा आहे. मीनाताई कांबळी यांनी 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
#आदिशक्तीच्या सोहळ्यात आम्हांला #स्त्रीशक्तीचा पाठिंबा
— Naresh Mhaske (@nareshmhaske) October 18, 2023
अजून भगिनी बाहेर पडतील #उठा जरा थांबा
संघटनेची बांधणी, प्रवास, जनसंपर्क केला
पण त्यांच्या तुम्ही
शून्य गोळा दिला#आमदार #खासदार #नगरसेवक
आता #नेते- #उपनेते येतायत#शिंदे_साहेबांचंच नेतृत्व #समर्थ
आहे हेच दर्शवतायत
बंद… pic.twitter.com/nuj6Kl7ACJ
मीनाताई कांबळी यांच्या कार्यपद्धतीला घेऊन स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे, विशेषत: महिला शिवसैनिकांचे आक्षेप होते. अशातच काही महिला शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मीनाताई कांबळी यांच्या पक्ष प्रवेशानंतर या महिला पदाधिकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.