उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?
उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकतंच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं होतं.
उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारीही दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. पण मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचं समजतं. तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं कळतं.
यातील इंटरेस्टिंग बाब म्हणजे उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतं. उर्मिला मातोंडकर यांचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. मात्र मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसंच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं.
तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नावांबाबत गुप्तता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावावरुन महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याची माहिती समोर येत आहे. तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. राज्यपालांना नाव देत असताना नेमका कोणता निकष ठरवायचा याबाबत देखील संभ्रम असल्याचं कळतं. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषाबाहेर नाव दिल्यास राज्यपाल त्या नावाना आडकाठी करु शकतात किंवा ही नाव फेटाळली जाऊ शकतात. या प्रकरणात कोर्टात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहे. त्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या
'Legend' म्हणत उर्मिलाला पूजा भट्टचा पाठिंबा
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी पुढे सरसावली