'Legend' म्हणत उर्मिलाला पूजा भट्टचा पाठिंबा
दोन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रनौत यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. यात आता पूजा भट्ट हिने उडी घेतली आहे.
दोन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रनौत यांच्यातला वाद मोठाच उफाळला आहे. कंगना गेल्या महिन्याभरापासून जे काही बरळू लागली आहे, त्या वक्तव्यांना उर्मिलाने आपल्या मतांनी उत्तर दिलं आहे. उर्मिलाने केलेली टीका आता कंगनाला झौंबली. म्हणूनच कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना माणूसकीची पातळी सोडत उर्मिलावर अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यावर उर्मिलाची बाजू अभिनेत्री पूजा भट्टने घेतली आहे.
अभिनेत्री पूजा भट्ट या वादात कधीच पडली नव्हती. तरीही तिचं नाव कंगनाने घेतल्यानंतर नेपोटिझमवरून तिलाही खूप ट्रोल केलं गेलं. धमकावलं गेलं. म्हणून इन्स्टावरचं अकाऊंट पूजाने पर्सनलाईज्ड केलं. त्यानंतर पूजा गप्प होती. पण कंगनाने उर्मिलावर टीका केल्यानंतर मात्र तिने उर्मिलाची बाजू घेतली आहे. आपल्या ट्विटमध्ये पूजा म्हणते, 'उर्मिला तू लेजंड आहेस. तू आपल्या रंगीलामधून आपल्या कामाची उंची दाखवून दिलीस. रंगीला ही डोळ्यांना आणि भावनांसाठी उत्तम मेजवानी होती. ती सगळ्याच गोष्टींना मोडत आपलं स्थान मिळवलंस. त्याकाळी हे सोपं नव्हतं. ती संवेदनशील आहेस आणि आपली प्रतिष्ठा राखून आहेस. याबद्दल मला आदर वाटतो. '
पूजा भट्टवरही कंगनाने बरीच टीका केली होती. सुशांतच्या मृत्यूला जी मंडळी जबाबदार असल्याचा आरोप कंगनाने केला होता त्यात महेश भट्ट यांचंही नाव होतं. रियाला सुशांतपासून तोंडण्यात महेश भट्ट यांचा हात असल्याचा आरोपही झाला. पुढे नेपोटिझमबाबतीतही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. त्यामुळे आलिया आणि पूजा यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले. असं असताना आता पूजाने उर्मिलाची बाजू घेतली आहे. या ट्विटमध्ये तिने कंगनाचा काहीच उल्लेख केलेला नाही. पण उर्मिलाला मात्र तिने लेजंड असं संबोधलं आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना बोलू लागली ते ती थांबायचं नाव घेत नाहीय. सुशांतचा तपास मुंबई पोलीस नीट करत नसल्याचा आरोप करत तिने मुंबई पोलिसांवरही अपमानास्पद वक्तव्य केलं. मुंबई पोलिसांना राज्य सरकार पाठिशी घालत असल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, खासदार संजय राऊत आदींवर निशाणा साधला. संपूर्ण मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देण्यात तिने धन्यता मानली. त्यानंतर राज्य सरकारची जो बाजू घेईल त्याच्यावर ती बरसत राहीली. राज्य सरकारने तिच्या ऑफिसचं बांधकाम तोडल्यानंतर राज्य सरकारला तिने बाबराची उपमा दिली. अर्थात राज्य सरकारने सूड बुद्धीने असं पाऊल उचलायला नको होतं असंही अनेकांना वाटतं. यावर उर्मिला मातोंडकर पहिल्यांदाच बोलती झाली ती माझा कट्टा या एबीपी माझाच्या लोकप्रिय कार्यक्रमात. त्यानंतर कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना उर्मिलावर असभ्य टीका केली. तिच्या या टीकेचा अनेक स्तरातून निषेध होतो आहे.
महत्वाच्या बातम्या :
ड्रग्स प्रकरणी करण जोहर अडचणीत? पार्टीतील व्हायरल व्हिडीओच्या तपासाची अनेकांची मागणी
हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो, कंगनाचं वादग्रस्त ट्वीट
Kangana Ranat | वाचाळ कंगना रनौतवर बिनधास्त बोला; काय आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया