तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? म्हणत संजय राऊतांचा भाजपवर संताप, म्हणाले, तुमचा पण नंबर येईल
भाजप (BJP) नेत्यांकडून महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांना जेलमध्ये जावं लागणार असल्याची वक्तव्य केली जात आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : राज्यात सध्या ईडीची कारवाई, एनसीबी, आयकर विभाग, ड्रग्ज केस अशा अनेक विषयांवरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना जोरदार रंगला आहे. रोज कुणी ना कुणी नेता एकमेकांवर टीका करत असल्याचं चित्र आहे. त्यात भाजप (BJP) नेत्यांकडून महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांना जेलमध्ये जावं लागणार असल्याची वक्तव्य केली जात आहेत. यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे.
आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप
संजय राऊत म्हणाले की, भाजपमधले काही फुटकळ लोकं धमक्या देत आहेत. असे लोक ज्यांचा भाजपशी काही संबध नाही जे मुळ भाजपा मधले नाहीत, ज्यांना भाजप माहित नाही, विचारधारा माहीत नाही ते लोक धमक्या देत आहेत. रोज उठतात आणि बोलतात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, तुरुंग विकलेत का?, तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? की तुरूंगाच खासगीकरण केलं आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...
राऊत म्हणाले की, तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? की तुरूंगाचं खासगीकरण केलं आहे? पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक जागाचं खासगीकरण केलं आहे. तुरूंगाचं सुद्धा खासगीकरण केलं आहे का? आणि त्यांच्या चाव्या या काही लोकांकडे दिल्या आहेत का ? जे बाहेरून आले आहेत असा सवाल देखील राऊतांनी केला आहे.
राऊतांनी म्हटलं की, खासगीकरण केलं असेल तर सांगा. तुम्ही कायद्याचे पण मालक झाले आहात का? आज ह्याचा नंबर उद्या त्याचा नंबर. तुमचा पण नंबर येईल, असंही संजय राऊत म्हणाले.