नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...
पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक ऑडियो क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि NCBचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
Nawab Malik On drugs Case update: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज (रविवारी) आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. मात्र पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि NCBचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
काय आहे क्लिपमध्ये
नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि NCBचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. हिंदी भाषेतील हा संवाद आहे, जो मराठीत असा आहे...
सॅनविल- सर सॅनविल बोलतोय
व्ही व्ही सिंह- कोन सॅनविल
सॅनविल- सर, तुम्ही एक नोटिस दिली आहे ना मला.
सिंह- अच्छा, सॅनविल, सॅनविल.. बांद्र्यात राहतो ना तू.
सॅनविल- हो, सर. मी जरा बाहेर होतो. माझी तब्येत बरी नव्हती. मला माहिती मिळाली.
सिंह- मग आता परत ये.
सॅनविल- मी अजून पोहोचलेलो नाही. तब्येतही खराब आहे. सर मला एक दिवस हवा आहे आणखी.
सिंह- मग कधी येशील
सॅनविल- मी सोमवारी येऊ का?
सिंह- सोमवारी नको मग तू बुधवारी ये. सोमवारी मी नाही.
सॅनविल- ओके सर.
सिंह- आणि ऐक. मोबाईल घेऊन ये. मला आता जास्त नाटकं नको आहेत. माझ्याकडे तुझा IMI नंबर आहे. तोच फोन घेऊन ये. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय.
सॅनविल- ओके, सर मी तसं नाही करणार
सिंह- ओके. मग बुधवारी ये.
Telephone conversation between Sanville Steanley D'souza and V.V. Singh (NCB official) pic.twitter.com/YdSeN2uitz
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 7, 2021
भाजप नेते मोहित कंबोज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित सुनील पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता रविवारी सकाळी नवाब मलिक पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसल्या. सध्या या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अशातच काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे. मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती उघड करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मलिक यांच्याविरोधात आरोप सुरू केले. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यावर मलिक यांनी मोहित कंबोज हे समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य असून पत्रकार परिषदेत खोटे आरोप केले आहेत. मी या प्रकरणी सत्य सर्वांसमोर आणणार असल्याचे मलिक यांनी कंबोजच्या पत्रकार परिषदेनंतर म्हटले.
मोहित कंबोज यांनी काय म्हटले?
भाजपच्या मोहित कंबोज यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशीसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. 20 वर्षांपासून त्यांचे राष्ट्रवादी पक्षासोबत संबंध राहिले आहेत. फक्त संबंधच नाही, तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांचे ते चांगले मित्र आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांचे त्यांच्याशी घरचे संबंध असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला.
अनिल देशमुखांवर इडीची सुरू असलेल्या कारवाईत सुनील पाटील यांची भूमिका आहे. राज्याच्या गृहविभागात अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. सुनील पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत असल्याचंही कंबोज म्हणाले.