Shiv Sena Mla Disqualification : शिवसेना शिंदे गट आमदार अपात्रतेची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज अडीच तासात नेमकं काय घडलं?
Shiv Sena Mla Disqualification Hearing : शिवसेना शिंदे गट आमदार अपात्रतेच्या मुद्यावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली.
मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्यावर (Shiv Sena Mla Disqualification) सुनाावणी घेतली. जवळपास अडीच तास सुनावणी सुरू होती. शिंदे गटाच्या वकिलांनी (Shiv Sena Shinde Faction) प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी अशी मागणी केली. तर, ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) वकिलांनी या मागणी जोरदार विरोध केला. आता आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी होईल की एकत्रित सुनावणी होईल, याबाबतचा निकाल 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष सुनावण्याची शक्यता आहे.
याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाच्या वडिलांकडून याचिकांमधील मुद्द्यांची मांडणी करण्यात आली. तब्बल अडीच तास सुनावणी सुरू होती.
शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी म्हटले की, सुनावणी वेळेत होईल यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आहे. आमदारांच्या वेगवेगळ्या याचिका असून त्यांची कारणेदेखील वेगवेगळी आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे सुनावणी घ्यावी असा मुद्दा मांडला असल्याचे अॅड. अनिल साखरे यांनी म्हटले. आजच्या सुनावणीत तीन अर्जांवर सुनावणी झाली. यामध्ये आमदार अपात्रतेच्या मुद्यावर एकत्र सुनावणी व्हावी, काही अधिकचे कागदपत्रे द्यायचे आहे, कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावे, ठाकरे गटाला आणखी अतिरिक्त मुद्दे त्यांना उपस्थित करायचे आहेत, या तीन अर्जांवर आज सुनावणी झाली असल्याचे अॅड. साखरे यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिंदे गटावर टीका केली. कायद्याचा किस पाडून वेळ काढला जात आहे.प्रत्येक आमदाराची सुनावणी स्वतंत्र करणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची तलवार टांगती आहे. त्यामुळे वेळकाढूपणा सुरू असल्याचे देसाई यांनी म्हटले. न्यायाला उशीर हा अन्याय केल्यासारखं आहे. सुप्रीम कोर्टातून न्याय मागावा की अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे संकेतही अनिल देसाई यांनी दिले.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रतोद सुनिल प्रभू यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्ष यांनी आज सुनावणी घेतली. आमचे वकील देवदत्त कामत यांनी एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी केली. मात्र शिंदे गटाने वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी लोकशाहीला धरून निर्णय द्यायला हवा अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली.