Sanjay Raut Press conference : 'त्या' साडेतीन नेत्यांची नावं उद्यापासून सांगणार; संजय राऊतांनी आज उल्लेख केलेली पाच नावं
Shivsena Leader Sanjay Raut Press Conference : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पाच नावांचा उल्लेख केला. यामध्ये सोमय्या पिता-पुत्रांचा समावेश आहे.
Shivsena Leader Sanjay Raut Press Conference : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि पीएमसी बँक घोटाळ्यावर गौप्यस्फोट केला. पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात धाडणार असा दावा केला होता. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणत्याही भाजप नेत्यांचा उल्लेख न करता पाच नेत्यांची नावे घेतली.
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली. पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान याच्यासोबत किरीट सोमय्या यांचा मुलगा निल किरीट सोमय्याची भागिदारी असल्याचा आरोप केला. पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा हा निल सोमय्यांच्या व्यवसायात वापरला असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी कोणाची नावे घेतली ?
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyya), मुंबई महापालिका नगरसेवक निल किरीट सोमय्या (Neil Kirit Somaiyya), भाजपचा माजी पदाधिकारी मोहित कंबोज (Mohit Kamboj), अमोल काळे (Amol Kale), पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान (Rakesh Wadhavan) यांच्यासह जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani), देवेंद्र लधानी (Devendra Ladhani ) यांची नावे घेतली.
जितेंद्र नवलानी कोण?
जितेंद्र नवलानी कोण आहे, हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगावे असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. जितेंद्र नवलानी याचं नाव ऐकून ईडीच्या मुंबई आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांना घाम फुटतो असंही राऊत यांनी म्हटले. जितेंद्र नवलानी याने इतरांसोबत बिल्डरांकडून 300 कोटी रुपये वसूल केले असल्याचा आरोप राऊत यांनी दिला.
'ती' नावे उद्यापासून येणार
संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेआधी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात धाडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राऊत कोणाची नावं घेणार याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, राऊत यांनी ही नावे घेतली नाही. बुधवारपासून यातील प्रत्येक एका नेत्याचे नाव घेणार असून आगामी पत्रकार परिषदेत व्हिडिओही दाखवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :