Viral Video | वाहनासाठी वाट काढताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर काढली पिस्तुल, दोघे ताब्यात
खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करताच या व्हिडीओवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळालं. शिवाय तो अगदी झपाट्यानं व्हायरलही झाला
मुंबई : वाहतूक कोंडी हा सर्वांच्यापुढं उभा राहणारा एक महत्त्वाचा आणि प्रदीर्घ काळासाठी अनुत्तरितच राहिलेला प्रश्न. कितीही पर्याय आणि वाटा शोधल्या तरीही वाहतूक कोंडी कोणाला चुकलेली नाही. पण, यातूनही वाट शोधण्याची शक्कल अनेकजण लढवतात. अशीच शक्कल काही शिवसैनिकांनीही लढवली पण, आता मात्र हीच शक्कल त्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. याप्रकरणी दोघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे.
एमआयएमचे खासदार (imtiaz jaleel) इम्तियाज जलील यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात, वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहेत.
जलील यांनी व्हिडीओ ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ही दृश्य असून, त्यांनी रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांच्या कारवर असणारा लोगोच सर्वकाही सांगत असल्याची बाब इथं अधोरेखित केली. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक या घटनेची दखल घेणार का, असा प्रश्न त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत उपस्थित केला आहे.
हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra https://t.co/SaWy3UVuH6
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021
कायदा सर्वांनाच समान, असं कितीही म्हटलं गेलं तरीही अनेकदा उत्साहाच्या भरात याच कायद्याची पायमल्ली केली जाते याचंच हे एक उदाहरण असल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडीमुळं अनेकांनीच शिवसेना समर्थकांच्या या वर्तणुकीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा आता पक्षश्रेष्ठींची या प्रकरणावर नजर पडणार का आणि तसं झाल्यास ते नेमकी कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेकडून या कथित शिवसैनिकांवरील कारवाई प्रतिक्षेत असतानाच सध्या हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई- पुणे एक्स्प्रेस मार्गावर बंदूक दाखवत प्रवास करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी आर्म ऍक्ट 325 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनातील अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.