अखेर डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शाखेचे उद्धघाटन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेबांची शिवेसना या वेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे.
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या संघर्ष आता विकोपाला गेलेला पाहायला मिळत आहे. आज पोलीस बंदोबस्तात डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत खरेदी खत पूर्ण केल्याचा दावा शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यावेळी शाखेत येणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना देखील विरोध करण्यात आला. त्यामुळे दोन गट आपापसात भिडले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले. मात्र त्यानंतर डोंबिवली शहर शाखा परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शाखेचे उद्धघाटन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेबांची शिवेसना या वेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्ष ,शिवसेनेचे चिन्ह, दसरा मेळावा, दिवाळी पहाट अशा अनेक मुद्द्यांवरून हे दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुन्हा हे दोन गट समोरासमोर आले आहे. त्याला निमित्त ठरले ते डोंबिवलीतील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय...डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटांमध्ये तीन महिन्यापूर्वी देखील संघर्ष पाहायला मिळाला होता.
आज सकाळच्या सुमारास पोलीस संरक्षणात शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या शाखेचा ताबा घेतला. यावेळी शाखेत येणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना शाखेत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटात वाद झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्याना पांगवले. त्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शाखेचा ताबा घेतला.
दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाखे बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाळासाहेबांचे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी याबाबत बोलताना कोरोनाच्या दोन वर्षाच्या आधीपासून डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयाची कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू होतं. काही तांत्रिक अडचणी होत्या. कोरोना काळात कागदपत्र तयार करण्यास विलंब होत होता. आता वर्धमान एंटरप्राईजकडून बाळासाहेबांच्या शिवसेनेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत खरेदी खत केलं आहे. त्यानुसार आज शाखेचा ताबा घेतला आहे असे सांगितले आहे. दरम्यान वर्धमान एंटरप्राइजेसकडून जितेन पाटील यांनी खरेदी केली. जीतेन पाटील हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत