Sharad Pawar: 'आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल...'; शरद पवारांचा इशारा, एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र
Sharad Pawar: राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, असं शरद पवारांनी सांगितले.
मुंबई: राज्य सरकारने (Maharashtra Goverment) दुष्काळाबाबत (Maharashtra Drought) शासनाने कुठलीच भूमिका न घेतल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देखील शरद पवारांनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना पत्र लिहित शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही, असं शरद पवार म्हणाले. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही-
मी मागील महिन्यात दिनांक 24 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू ह्या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, असं शरद पवारांनी सांगितले.
मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर-
मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते-
मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते. आजमितीस ती संख्या 11 हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो आहे. परंतू ह्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो.