Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं, जयंत पाटील यांचं आवाहन
Sanjay Raut : राज्यातील विरोधी पक्ष पुन्हा एकदा मतदार यादीच्या मुद्यावरुन निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होणार आहेत. यासाठी 1 नोव्हेंबरला मोर्चा काढला जाणार आहे.

मुंबई : महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांकडून मुंबईत 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की शिवसेना भवनच्या पाचव्या मजल्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात. मात्र, त्यांच्या ऐवजी आज आपण पत्रकार परिषद घेतोय. महाराष्ट्र निर्माण सेनेचा संपूर्ण कॅबिनेट येथे आले आहे. बाळा नांदगावकर म्हणतात मी 24 वर्षांनी आले पानसे म्हणतात 11 वर्षांनी आलोय. गेल्या काही दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोगा विरोधात लढाई लढतोय.
यातून काय निष्पन्न होईल माहित नाही. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा आहे.
निवडणूक यादीत घुसलेले 1 कोटी मतदार बाहेर काढा असं आवाहन अमित शाह यांना करतो, असं संजय राऊत म्हणाले. ते पुढं म्हणाले की मंदा म्हात्रे, विलास भुमरे यांचा वक्तव्य आम्ही ऐकलं आहे. दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी आमदार सांगतात. संजय गायकवाड सुद्धा यावर बोलताय, असं राऊत म्हणाले.
मतदार याद्या पवित्र असायला हव्यात... त्यासाठी सर्व प्रमुख पक्ष लढत आहेत.1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा निघेल. या मोर्च्याच्या नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आणि काँग्रेस चे जेष्ठ नेते करतील. 1 नोव्हेंबर हा महाराष्ट्र साठी महत्वाचा आणि लोकशाही महत्वाचा असेल, असंही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात मोर्चा होणार आहे असाच मोर्चा हा दिल्लीत झाला होता. त्याला सर्व नेते उपस्थित होते. हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नये. प्रत्येकाचा पाठींबा या मोर्चाला आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग हात झटकतंय : सचिन सावंत
काँग्रेस नेते सचिन सावंत केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो, असं म्हटलं.. राहुल गांधी यांनी आधी सांगितलं की 41 लाख लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दरम्यान वाढले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने हात झटकले आहेत. घोळ युक्त यादी आहे. चुका त्यामध्ये आहेत, यादी आम्हाला प्राप्त झालेली नाही. आदर्श प्रक्रिया राबवली जात नाही. या सगळ्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत असं सचिन सावंत म्हणाले.
भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी निवडणूक ही मतदार यादी वर अवलंबून असते ती पारदर्शक असली पाहिजे, असं म्हटलं. आज निवडणूक आयोगाचा खुलासा आलेला आहे तो जुजबी आहे. सुधारणा झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. पुढचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे. भाजप ने मोडस ऑपरेंडी तयार केली आहे. मतदार यादी हा प्राथमिक मुद्दा आहे. मतदारांची तीव्र भावना दाखवण्यासाठी या मोर्चात सहभागी होऊ, असं प्रकाश रेड्डी म्हणाले.
निवडणूक आयोगाला कळलं घोळ झालाय: बाळा नांदगावकर
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मतदार यादी मधील घोळ ही भावना लोकांच्या मनात आहे. स्वतः आमदार सुद्धा ते बोलत आहेत. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलं होतं. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्यासाठी सांगितलं आहे. याचा अर्थ त्यांना कळलं की घोळ झाला आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले. आता ते थतूरमातुर उत्तर देत आहेत. निवडणूक आयोगाला लक्षात आलं आहे की याच्यात घोळ झाला आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
सत्तेतल्या नेत्यांनी मोर्चात यावं : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते समाधानकारक नाही, असं म्हटलं. सत्तेत असलेले नेते जर मोर्चात सहभागी झाले तर त्यांना कोणाची ना नाही. 1 तारखेला मोठा मोर्चा निघेल, असंही पाटील यांनी सांगितलं. शरद पवार यांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. दुबार मतदार काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार, पत्ते ज्यांचे नाहीत त्यांचं तुम्ही काय करणार आहात? खुलासा हा निवडणूक आयोगाने करावा, ते अनेक गोष्टी दडवून ठेवत आहेत.महाराष्ट्रात लोकशाही बद्दल आस्था आहे त्यांनी मोर्चात सहभागी व्हावं, असं जयं पाटील म्हणाले.
संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोग हे सरकारचं गुलाम आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा नाहीत मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आवाज उठवला पाहिजे, असं म्हटलं. मोर्चाचा रूट हे ते सगळे पक्ष मिळून ठरवतील.उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार या सगळ्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

























