ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
आम्ही आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते समाधानकारक नाही.

मुंबई : राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन राज्यातील मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ उघडकीस आणला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आजच्या मेळाव्यातून राज्यात 96 लाख मतदार बोगसपणे घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर, आता विरोधी पक्षाच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून निवडणूक आयोग कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनीही मोर्चात सहभागी होणार असल्याचे म्हटले. तसेच, ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो, ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
आम्ही आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते समाधानकारक नाही. सत्तेत असलेले नेते जर मोर्चात सहभागी झाले तर त्यांना कोणाची ना नाही. पण, ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत. येत्या 1 तारखेला आमचा मोठा मोर्चा निघेल, या मोर्चात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचा या मोर्चात सहभाग आणि पाठिंबा असेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. दुबार मतदार यादी काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार, मतदार यादीत ज्यांचे पत्ते नाहीत, त्यांचं तुम्ही काय करणार आहात? याबाबतचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. कारण, निवडणूक आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. तसेच, महाराष्ट्रात लोकशाहीबद्दल आस्था आहे, त्यांनी मोर्चात सहभागी व्हावं, असे आवाहन देखील त्यांनी केलंय.
निवडणूक आयोग थातूर मातूर उत्तरं देत आहे
मतदार यादीमधील घोळ ही भावना लोकांच्या मनात आहे, स्वतः आमदार सुद्धा ते बोलताय. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलं होतं, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्यासाठी सांगितलं आहे. याचा अर्थ त्यांना कळलं की घोळ झाला आहे. आता ते थातूरमातुर उत्तर देत आहेत. निवडणूक आयोगाला लक्षात आलं आहे की, याच्यात घोळ झाला आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. तसेच, 1 नोव्हेबंर रोजीच्या मोर्चात आम्ही पक्षाच्या वतीने सहभागी होऊ, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग सरकारचा गुलाम
राज्य निवडणूक आयोग हे सरकारचं गुलाम आहे, त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाहीत. मात्र, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आवाज उठवला पाहिजे. या मोर्चाचा रूट हे, ते सगळे पक्ष मिळून ठरवतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवार या सगळ्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर हा 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत निर्णय घेतला, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.



















