कुणाला बाळासाहेबांची कॉपी करायचीय, स्पॉन्सरशिपचं राजकारण करायचंय त्यांना करु द्या : संजय राऊत
Sanjay Raut Press Conferance : कुणाला बाळासाहेबांची कॉपी करायचीय, स्पॉन्सरशिपचं राजकारण करायचंय त्यांना करु द्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut Press Conferance : आर्थिक गुन्हे विभाग किरीट सोमय्यांची चौकशी करण्यासाठी सक्षम असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपच्या सांगण्यानं महाराष्ट्र चाललेला नाही, इथे कायद्याचं राज्य आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, पुढे बोलताना संजय राऊतांनी जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या, असा अप्रत्यक्ष टोला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना (Raj Thackeray) लगावला आहे.
आमची अयोध्या भेट राजकारण नव्हे, तर श्रद्धा : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. याबाबतचे प्रश्नच चुकीचे आहेत. कारण शिवसेना नेहमीच अयोध्या दौऱ्यावर जाते. तसेच, आमचं आणि अयोध्येचं नातं हे राजकीय नाही, निवडणुकीचं नाही, तसेच हे कोणत्याही षडयंत्रांचं भाग नाही. जेव्हापासून अयोध्येचं आंदोलन सुरु झालंय. तेव्हापासूनच शिवसेना आणि अयोध्येमध्ये एक नातं आहे. भावनिक नातं आहे. श्रद्धेचं नातं आहे. हे नातं तसंच असेल. जेव्हा सरकार नव्हतं तेव्हाही आम्ही जातचं होतो. आंदोलनाचा एक भाग होतो. महाराष्ट्रात सरकार आल्यानंतरही मुख्यमंत्री दोनवेळा अयोध्या दौऱ्यावर जाऊन आले आहेत. यंदा कोरोनामुळे आम्ही जाऊ शकलो नाहीत. त्यामुळे प्रभू श्री रामाचं दर्शन घेणं आमचं कर्तव्य आहे. तिथे आणखी काही कामं शिल्लक आहेत. खासकरुन भक्त निवासाचं काम आहे."
"अयोध्येत प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद नेहमीच शिवसेनेला मिळाला आहे. कारण आमचं मन स्वच्छ आहे. आम्ही जे काही करतो, ते राजकीय फायद्यासाठी नाही करत आम्ही श्रद्धा असल्यामुळे करतो. कोणीही अयोध्या दौऱ्यावर जावं. प्रभू श्रीरामाच्या चरणावर कोणाला जायचं असेल, मोकळ्या मनानं, स्वच्छ मनानं तर जावं. जर तुम्ही राजकीय हेतूनं गेलात, तर मात्र श्रीराम मदत करणार नाहीत.", असं राऊत म्हणाले.
जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या : संजय राऊत
औरंगाबादला राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "सरकारला कोणतंही आव्हान नाही किंवा शिवसेनेलाही नाही. मराठीवाड्यातील जनता खासकरुन औरंगाबादमधील जनता नेहमीच शिवसेनेला पाठिंबा देत आली आहे. खासकरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना आपला नेता मानलं आहे. जर कोणालाही तिथे सभा घ्यायची असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देशात लोकशाही आहे. त्यामुळे देशात कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. कोणी जर बाळासाहेबांची कॉपी करत असेल, तर तुम्ही काय करु शकता. उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात अनेक सभा घेतल्यात. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यासाठी आम्हाला कोणताही दिखावा करावा लागत नाही. जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या. शिवसेना आपल्या ताकदीवर देशात आणि महाराष्ट्रात राजकारणात सक्रिय आहे आणि करत राहील."
भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यावर महाराष्ट्र चाललेला नाही : संजय राऊत
जेम्स लेन पुस्तक प्रकरणी भाजपकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष काहीही म्हणू शकतं. भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यावर महाराष्ट्र चाललेला नाही. कायद्याचं राज्य आहे आणि ते कायद्यानुसारच चालेल."