(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशकातील राम मंदिराबाबतच्या वक्तव्याला 'सामना'तून प्रत्युत्तर
राममंदिराचा प्रश्न न्यायालयात असताना काही ‘बडबोले’ आणि ‘बयान बहाद्दर’ निरर्थक चर्चा घडवून आणत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली व ती योग्यच आहे. आता हे बडबोले कोण? यावर ‘बयानबाजी’ सुरू झाली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात राम मंदिर प्रकरणी केलेल्या वक्तव्याला शिवसेनेचं मुखपत्र सामनातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांना सर्वात जास्त त्रास त्यांच्याच पक्षातील बडबोल्यांपासून (वाचाळवीर) होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तोंडास कुलूप लावावे, असं मागे पंतप्रधानांना हात जोडून सांगावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात काय आहे?
राममंदिराचा प्रश्न न्यायालयात असताना काही ‘बडबोले’ आणि ‘बयान बहाद्दर’ निरर्थक चर्चा घडवून आणत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली व ती योग्यच आहे. आता हे बडबोले कोण? यावर ‘बयानबाजी’ सुरू झाली आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांना सगळ्यात जास्त त्रास स्वपक्षातील बडबोल्यांपासूनच होत आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तोंडास कुलूप लावावे असे मागे पंतप्रधानांना हात जोडून सांगावे लागले.
कश्मीरमधून 370 कलम जसे धडाक्यात हटवले त्याच हिमतीने अयोध्येतही भव्य राममंदिर उभारले जाईल, असा विश्वास देशातील जनतेला वाटत असेल तर त्यांना दोष का द्यावा? मोदी व शहा ज्या पद्धतीने साहसी निर्णय घेऊन देशवासीयांची मने जिंकत आहेत ते पाहता राममंदिराबाबत लोकांना विश्वास वाटू लागला आहे. राममंदिराबाबत गेल्या पंचवीसेक वर्षांपासून फक्त ‘बडबोले’पणाच सुरू आहे. अर्थात त्याच बडबोलेपणातून राममंदिर प्रश्नाची धग कायम आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका आल्या की, राममंदिरावरील वक्तव्यांना जोर येतो. राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे मान्य, पण अयोध्येत बाबरीचा विध्वंस झाला तेव्हाही हे प्रकरण न्यायप्रवीष्टच होते. तरीही बाबरी पाडून लोकांनी राममंदिर उभे केलेच.
सुप्रीम कोर्टात मंदिराबाबत अंतिम सुनावणी सध्या सुरू आहे. मात्र आता किती वाट पाहायची, राम मंदिराचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा. राम मंदिराच्या निर्मितीबाबत मोदी सरकारकारने कलम 370 प्रमाणे धाडसी पाऊल उचलावं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.