राज्यातील रुग्णालयात मृत्यूचं तांडव, मुख्यमंत्री मात्र त्यांचे 'बॉस' शहांच्या दरबारी; सामनातून थेट निशाणा
Saamana Editorial: थैल्या, आकडा, खोके या तीन शब्दांभोवतीच मुख्यमंत्र्यांच्या राजकीय जीवनाचे सार, असं म्हणत सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधण्यात आला आहे.
Saamana Editorial on CM Eknath Shinde: सरकारी रुग्णालयातील (Government Hospital) मृत्यू प्रकरणी सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) निशाणा साधला आहे. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली असताना मुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच, लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचा सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसलेत, असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
सामनात म्हटलं आहे की, "महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला बेहाल आहेत. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली आहे. रोज कुठे ना कुठे मृत्यूची छापेमारी सुरूच आहे. या सर्व तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री." तसेच, लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पडली आहेत, पण आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कोठे आहेत? ते दिल्लीत काय करीत आहेत? असा सवालही थेट मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री त्यांचे 'बॉस' अमित शहांच्या दरबारी वार लावून बसलेत : सामना
"नक्षलवादाचा मुकाबला करण्यासंदर्भातील एक बैठक गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत बोलावली. त्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे एक दिवस आधीच दिल्लीत पोहोचले. महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरू असताना मुख्यमंत्री त्यांचे 'बॉस' अमित शहा यांच्या दरबारी वार लावून बसले आहेत. नक्षलवादाचा विषय गंभीर आहेच, पण सरकारी इस्पितळांतील बळी हा त्यापेक्षा जास्त चिंतेचा विषय आहे. शिंदे हे अनेक वर्षांपासून गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषवीत आहेत. या पालकमंत्री पदाचा व नक्षलवाद्यांचा काहीएक संबंध नसून गडचिरोलीतील 'माईनिंग' उद्योगावर नियंत्रण राहावे व तेथील आर्थिक उलाढालीत सहभागी होता यावे यासाठी गडचिरोलीची योजना आहे. नक्षलवादाशी मुकाबला वगैरे फक्त बहाणा आहे. मुख्यमंत्री महोदयांचे बूड महाराष्ट्रात टिकत नाही व ते सतत दिल्लीस पळत आहेत. पालकमंत्री कुणाला नेमायचे, महामंडळांचे वाटप कसे करायचे, असे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ऊठसूट दिल्ली वाऱ्या करतात. स्वाभिमानासाठी पक्षत्याग करणाऱ्यांचे हे असे हाल सुरू आहेत. दिल्लीने 'ऊठ' म्हटले की उठायचे व 'बस' म्हटले की बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेना या महाराष्ट्र अभिमानी पक्षाचे नाव त्यांनी धुळीस मिळविले आहे. शिंदे गटाच्या विचारांतून, कृतीतून, जाहिरातींतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व छायाचित्र आता हटवले गेले आहे. आता फक्त 'मोदी मोदी-शहा शहा'चा गजर सुरू आहे. उद्या ते शिवसेनेची स्थापना मोदींमुळे झाली, मोदींचीच शिवसेना खरी असे बोलायलाही कमी करणार नाहीत. भाजपने शिवसेनेशी उभा दावा मांडला व त्यासाठी शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांना हाताशी धरले ते यासाठीच.", असंही सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.
दिल्लीकडून घातले जात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हिताची एक तरी 'बात' केली आहे काय? मुंबईची लूट व ओरबाडणे सुरू असताना यांचा जीव जळतोय का? असं म्हणत सामना अग्रलेखातून सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
थैल्या, आकडा, खोके या तीन शब्दांभोवतीच मुख्यमंत्र्यांच्या राजकीय जीवनाचे सार : सामना
मुख्यमंत्री दिल्लीत जातात, पण नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगरातील ज्या सरकारी इस्पितळांत औषधोपचारांअभावी रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे तेथे जात नाहीत. बळी गेलेल्या नवजात शिशूंच्या दुर्दैवी मातांचे अश्रू पुसावेत, असे त्यांना वाटत नाही. यमाच्या रेड्यावर बसून ते फक्त मदतीचा आकडा जाहीर करीत आहेत. थैल्या, आकडा, खोके या तीन शब्दांभोवतीच त्यांच्या राजकीय जीवनाचे सार गुंतले आहे, असं म्हणत सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हे स्वकर्तृत्वाचे फळ नसून भाजपच्या मेहेरबानीचे दान : सामना
"2024 पर्यंत शिंदे हे मुख्यमंत्री राहतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर केली. याचा अर्थ 2024 नंतर शिंदे यांना काशीच्या हरिश्चंद्र घाटावर जावे लागेल व त्यांचे औटघटकेचे राजकारण भाजपने संपवलेले असेल. शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हे स्वकर्तृत्वाचे फळ नसून भाजपच्या मेहेरबानीचे दान आहे. आज हे दान त्यांच्या झोळीत पडले. उद्या अजित पवारांच्या हाती पडेल, पण यामुळे महाराष्ट्राच्या हाती भिक्षापात्र आले आहे व त्यास शिंदे-मिंधे-दादा गटाची महाराष्ट्रद्रोही लुच्चेगिरी कारणीभूत आहे, याची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही.", असंही सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.