Rana VS Shivsena : राणा दाम्पत्याने पोलिसांना गुंगारा देत 'अशी' गाठली मुंबई !
Ravi and Navneet Rana in Mumbai : अमरावती पोलीस आणि शिवसैनिकांकडून अटकाव होण्याची शक्यता लक्षात घेता राणा दाम्पत्याने मध्यरात्रीच अमरावती शहर सोडले
Ravi and Navneet Rana in Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर त्यांनी खारमधील आपलं निवासस्थान गाठलं. शिवसैनिकांना आणि पोलिसांना गुंगारा देऊन अमरावती ते मुंबई प्रवास राणा यांनी कसा केला याची खास माहिती एबीपी माझाच्या हाती लागली.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे आज रात्री रेल्वेने आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत येणार होते. मात्र, पोलिसांकडून अटकाव होण्याची कुणकुण लागल्याने राणा दाम्पत्याने पहाटे तीन वाजता नागपूरसाठी प्रवास सुरू केला. नागपूर विमानतळावरून त्यांनी सकाळी 6 वाजता मुंबईसाठी विमानाने निघाले. मुंबईत आल्यानंतर राणा यांनी खार येथील निवासस्थान गाठले. राणा दाम्पत्य मुंबईत येण्यापूर्वी गुरुवारी दुपारी राणा यांचे कार्यकर्ते सहा गाड्या करून मुंबईसाठी निघाले. तर, आजही काही कार्यकर्ते मुंबईसाठी निघाले आहेत. त्याशिवाय अजूनही काही कार्यकर्ते सायंकाळी रेल्वेने मुंबईसाठी निघणार आहेत.
दरम्यान, मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचे समजताच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे अनेक नेते मातोश्रीजवळ दाखल झाले. त्याशिवाय नंदगिरी गेस्ट हाऊसजवळही शिवसैनिकांची गर्दी झाली होती.
राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचले.
अमरावती ते नागपूर प्रवास असा केला
संध्याकाळीच रवी राणा आणि नवनीत कोर राणा यांनी विमानाने मुंबई गुप्तपणे गाठायचं ठरवलं. नागपूरहुन मुंबईला जाणारं पहिलं विमान सकाळी सहा वाजताचं आहे. पुढच्या दोन ते तीन विमानांची तिकीट या दोघांनी काढून ठेवली होती. सतत त्यांच्या घरावर लोकांचं लक्ष केंद्रित होतं, पाळत होती, त्यामुळे रात्री दोनच्या सुमारास हे दांपत्य अगदी गुप्त पद्धतीने आपल्या घरातून निघून नागपूरच्या मार्गी लागले. त्यांच्याबरोबर काही निवडक कार्यकर्तेही गाडीत होते. या सगळ्यांची वेगवेगळ्या विमानांची तिकीट काढून ठेवण्यात आली होती.
जर काही अडचण आली आणि विमान सुटलं तर पुढील विमानाचे तिकीट हातात हवे यामुळे त्यांनी पुढील विमानाची तिकिटे काढली होती. त्याशिवाय, दोघांना जर एकत्र जाता आले नाही, तरी वेगवेगळ्या विमानात तिकीट हवी. रात्री साडे तीनच्या सुमारास ही सगळी मंडळी नागपूर विमानतळावर पोहचले.
व्हीआयपी असल्याचा गवगवा न करता त्यांनी विमानतळाच्या आत प्रवेश केला. विमानतळावरील लाँज गाठला आणि उरलेली रात्र तिथेच घालवली. राणा दाम्पत्याने कोणाला काही कळण्याच्या आधी सकाळी सहा वाजताच इंडिगोच्या विमानातून सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मुंबई गाठली. आम्ही मुंबईत पाय कसे ठेवतात हे आम्ही बघू म्हणणाऱ्यांना आमचं हे उत्तर आहे असं नवनीत कौर राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
'वर्षा' आणि 'सिल्वर ओक'चीही सुरक्षा वाढवली
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या त्याच्या खासगी आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानची सुरक्षाही वाढवली आहे.