राज ठाकरे मनसे पदाधिकारी हत्येप्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार
मनसे प्रमुख राज ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या हत्येमागे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.
मुंबई : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी आज राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर आरोप करत शरद पवार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नजीब मुल्ला यांचे नाव या हत्येमागे असल्याचे वारंवार समोर येत आहे. ही नेमकी केस काय आहे ते जाणून घेऊया.
23 नोव्हेंबर 2020, ठाण्यातील राबोडी विभागात खचाखच भरलेल्या मार्केटमध्ये दिवसा ढवळ्या एकाची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. काही क्षणातच राबोडी मधील वातावरण गंभीर झाले. कारण ज्याची हत्या झाली होती तो होता मनसे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ता जमील शेख. गेली अनेक वर्ष जमीन शेख रावडी आणि ठाण्यामधील भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामांचे प्रकरण उघडकीस आणण्याचे काम करत होते. त्याच रागातून त्यांची हत्या झाली असावी असा आरोप करण्यात आला. मात्र, आज राज ठाकरे यांनी या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा सहभाग असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
जमील शेख यांच्यावर 2014 साली देखील असाच हल्ला झाला होत. मात्र, त्यातून ते बचावले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर आरोप केला होता. आणि आता देखील त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एफआयआरमध्ये संशयित म्हणून नजीब मुल्ला यांचेच नाव टाकले होते.
कोण आहेत नजीब मुल्ला
ठाण्यातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ आणि वजनदार नगरसेवक. जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख. 2002 पासून आतापर्यंत चार वेळा नगरसेवक म्हणून आले निवडून. ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे गटनेता, पालिकेतील विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य अशी अनेक पदे त्यांच्याकडे होती. कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेचे सुरुवातीपासून अध्यक्ष. मात्र, ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ज्या चार नगरसेवकांची नावे डायरीत सापडली होती. त्यापैकी नजीब मुल्ला हे देखील होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ते काही काळ जेलमध्ये देखील होते.
परमार केसचे पुढे काहीही झाले नाही. त्यातच आता नव्या केसमध्ये नजीब मुल्ला यांचे नाव आल्याने राबोडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नजीब मुल्ला यांची अनधिकृत कामे जगासमोर आणल्याने त्यांची सुपारी देण्यात आली असा आरोप पुन्हा एकदा मनसेने केला आहे.
ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरणी शूटरला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, सूत्रधाराची उकल होणार?
या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. त्यापैकी एकाला उत्तर प्रदेशच्या एसटीएफने अटक करून ठाणे क्राईम ब्रांचच्या हवाली केले आहे. त्याच आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या चौकशीत थेट नजीब मुल्ला यांचे नाव घेतले आणि हा त्यासाठी दोन लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी ओसामा अजूनही फरार आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ओसामानेच सुपारी घेतली असून त्या बदल्यात दहा लाख रुपये देखील त्याला मिळाले होते. त्याला पकडण्यासाठी अजूनही ठाणे क्राइम ब्रांचची एक टीम उत्तर प्रदेश मध्ये आहे.
याप्रकरणी आम्ही नजीब मुल्ला यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तर दुसरीकडे पोलीस देखील जोपर्यंत मुख्य आरोपी सापडत नाही तोपर्यंत काहीही बोलणार नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ठाणे क्राइम ब्रांचवर या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे ते शोधण्याचे मोठे आव्हान आहे.