राज ठाकरे यांचा नवीन घरात प्रवेश, कृष्णकुंज नाही तर आता 'हा' असणार नवीन पत्ता
Raj Thackeray New Home Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे.
Raj Thackeray New House Shivtirth Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS Chief) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. अमित ठाकरे यांनी आज या नव्या घराच्या नामफलकाचं उद्घाटन केलं. राज ठाकरेंच्या या नव्या घराचं नाव असणार आहे शिवतीर्थ. दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे आज कुटुंबासह गृहप्रवेश करणार आहे.
थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत प्रवेश करतील. यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे. शिवसेनेच आदराचं स्थान अर्थात शिवाजी पार्कातील शिवतीर्थ. आता राज ठाकरे यांनी आपल्या नवीन वास्तुचं नाव शिवतीर्थ ठेवल्यानंतर शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे.
दोन आठवड्यापूर्वी राज ठाकरेंना झाली होती कोरोनाची लागण
दोन आठवड्यापूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) कोरोनाची (Corona) लागण झाली होती. राज ठाकरेंच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज ठाकरे यांना कोणतीही लक्षणं नव्हती. राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकींनिमित्त मनसेचे पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावे पुढे ढकलण्यात आले होते.
गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे आणि त्यांचा परिवार कृष्णकुंज निवासस्थानी राहत आहेत. कृष्णकुंजवर अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या. याच ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते किंवा इतर नेते मंडळी राज ठाकरेंना भेटायला येतात. मनसेच्या अनेक बैठकाही राज ठाकरे कृष्णकुंजवर घेतात. परंतु आता राज ठाकरे हे शिवतीर्थ या 5 मजल्याच्या इमारतीत राहायला जाणार आहेत.