राफेल संदर्भातील टिकेवरून दाखल तक्रार रद्द करण्याची मागणी; राहुल गांधींची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
राफेल संदर्भातील टिकेवरून दाखल झालेली तक्रार रद्द करण्याची मागणी करत राहुल गांधींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Rafale Deal : राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना (Rahul Gandhi) कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे आलं होतं. मात्र राहुल गांधी यांचे वकील कोर्टात वेळेत उपस्थित राहू न शकल्यामुळे ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ', 'चौकीदार चोर है', 'चोरो का सरदार'अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि त्यातील सदस्यांचीही प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमाळ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या वक्तव्यांचा या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.
20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, "गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है" असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्वीट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :