अंबरनाथमध्ये सत्ताधारी शिवसेनेचा पाण्यासाठी मोर्चा
दरम्यान, जर हा प्रश्न सुटला नाही, तर अधिकाऱ्यांच्या घशात गढूळ पाणी ओतू, असा इशारा शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे.
कल्याण : अंबरनाथमध्ये सत्ताधारी शिवसेनेनं आज पाण्यासाठी मोर्चा काढला. अंबरनाथ पालिकेपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चामुळे लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याचं उघड झालं आहे.
अंबरनाथ शहरात सध्या अपुरा पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणं, गढूळ पाणी येणं, पाण्याची बिलं वेळेवर न येणं असे प्रकार घडत असून याविरोधात काही दिवसांपूर्वी नागरिकांनी रस्ता रोकोही केला होता. त्यानंतरही हे प्रकार सुरुच असल्यानं आज शिवसेनेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयार पाणीहक्क मोर्चा काढला.
अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार, नगराध्यक्ष, शहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पालिकेतील सत्तेपासून आमदार, खासदारही शिवसेनेचे असताना शिवसेनेला एखाद्या प्रश्नासाठी मोर्चा काढावा लागत असल्यानं सेनेच्या लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही का? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे.
दरम्यान, यानंतरही जर हा प्रश्न सुटला नाही, तर अधिकाऱ्यांच्या घशात गढूळ पाणी ओतू, असा इशारा शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे.