पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या
पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) सुरक्षेमध्ये असलेले एस पी जी कमांडो सुभाष चंद्रा यांची पर्स लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेली. सुभाष चंद्रा मुंबईमध्ये फिरण्यासाठी आले होते.
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत कुठल्याही प्रकारची कमतरता नसते. जिथे नरेंद्र मोदी असतील त्यांच्या आसपास कडेकोट बंदोबस्त असतो आणि यामध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे एस पी जी कमांडो. अशाच एका एसपीजी कमांडोची पर्स मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये असलेले एस पी जी कमांडो सुभाष चंद्रा यांची पर्स लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेली. सुभाष चंद्रा मुंबईमध्ये फिरण्यासाठी आले होते. तीन वर्षांच्या डेप्युटेशनवर ते नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. सुभाष चंद्रा यांचा मुंबई फिरण्याचा प्रवास काही फारसा सुखकर झाला नाही.
17 नोव्हेंबर रोजी सुभाष चंद्रा यांनी मुंबईच्या विलेपार्ले स्टेशन वरून महालक्ष्मीला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सुभाष चंद्रा लोकल ट्रेनने प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान त्यांची पर्स चोरांनी लंपास केली. सुभाष चंद्रा यांना ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी सुद्धा याप्रकरणाचा गांभीर्य ओळखत युद्ध पातळीवर लगेच तपास सुरू केला.
अंधेरी रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्स चोरणाऱ्या चोराला अंधेरी रेल्वे पोलिसांनी पकडलं. मात्र सुभाष चंद्रा यांच्या पर्समधील पैसे गायब होतेच तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून हजारो रुपये सुद्धा त्या चोराने खर्च केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेला चोर हा सराईत गुन्हेगार आहे आणि अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. पकडण्यात आलेला चोर हा एकटा नसून त्याच्याबरोबर त्याचे अजून काही साथीदार असण्याची शक्यता आहे. ज्यांचा शोधा पोलिसांनी सुरू केला आहे.
ही टोळी अशाच प्रकारे गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांचे पर्स लंपास करून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा सुद्धा गैरवापर करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहण्याची गरज आहे, असं आवाहन करण्यात येत आहे.