एक्स्प्लोर
मुंबईत 'खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा', महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज
मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्तांनी ही नवी योजना आणली आहे. याआधी राज्यातील पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर 15 डिसेंबरनंतर खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, असं सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र राज्यातील अनेक रस्त्यांवर देखील खड्ड्यांचं साम्राज्य अजूनही कायम आहे.

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा हजार रुपये मिळवा अशी घोषणा केल्यानंतर ती घोषणा हवेतच विरली. मात्र आता मुंबई महापालिकेने देखील 'खड्डे दाखवा, पैसे मिळवा' ही योजना सुरु केली आहे. मुंबईत उद्यापासून खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा ही योजना सुरु होणार आहे. मुंबईकर खड्ड्यांनी त्रासलेले असताना खड्डेमुक्त मुंबईचा दावाच एकप्रकारे मुंबई महापालिकेने केला आहे. उद्या एक नोव्हेंबर पासून खड्डा दाखवला तर मुंबईकरांना मिळणार 500 रुपये आहेत. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्त प्रविण परदेशींनी ही नवी योजना आणली आहे. अर्थातच यासाठी काही अटी आणि शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत. काय आहेत महापालिकेच्या अटी-शर्ती - मुंबईकरांनी दाखवलेला कमीतकमी खड्डा 1 फुट लांब आणि 3 इंच खोल पाहिजे - तक्रारीनंतर 24 तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत. - खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेसाठी My BMC pothole fixlt या अॅप वर जाऊन खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल. शहरातील रस्त्यांवर अवघे 414 खड्डे आहेत, असा दावा मुंबई महापालिकेने ऑगस्ट महिन्यात केला होता. मात्र सामान्य नागरिकांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही महापालिकेचा हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी महापालिकेच्या 'MCGM 24x7' अॅपवर हजारो तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अनेक खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र मुंबईतील अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डे कायम आहेत. आता मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्तांनी ही नवी योजना आणली आहे. याआधी राज्यातील पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर 15 डिसेंबरनंतर खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, असं सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र राज्यातील अनेक रस्त्यांवर देखील खड्ड्यांचं साम्राज्य अजूनही कायम आहे.
आणखी वाचा























