ऐतिहासिक पोखरण अणूचाचणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या शिलेदाराचं निधन
ऐतिहासिक पोखरण अणूचाचणी (pokhran atomic test)प्रक्रियेत महत्वाचा सहभाग असलेले तंत्रज्ञ, भाभा अणूसंशोधन केंद्रातील तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे निधन झाले.
Navi Mumbai : अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या (Atal Bihari Vajpayee) काळात झालेल्या ऐतिहासिक पोखरण अणूचाचणी (pokhran atomic test)प्रक्रियेत महत्वाचा सहभाग असलेले तंत्रज्ञ, भाभा अणूसंशोधन केंद्रातील तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. संजय चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
संजय चव्हाण हे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात( बीएआरसी) सन 1982 मध्ये रुजू झाले होते. अणुभट्टीच्या इंधनाच्या निर्मिती प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या असलेल्या रेडिओ मेटलर्जी डिव्हिजनमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. अभियांत्रिकी अभियंता पदविकाधारक असलेल्या चव्हाण यांचा रेडिओ मेटलर्जीतही हातखंडा होता. संजय चव्हाण यांच्या बीएआरसीतील कर्तृत्वाचा कळस म्हणजे 1998 च्या पोखरण अणूचाचणीच्या (ऑपरेशन शक्ती 2) प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. मात्र प्रसिद्धीपासून ते कटाक्षाने दूर राहिले.
संजय चव्हाण हे लहानपणापासूनच अध्यात्मिक प्रवृत्तीचे
आई-वडील हे धार्मिक असल्याने संजय चव्हाण हे लहानपणापासूनच अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते.काही काळ त्यांनी त्रंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत येथे आणि श्री रामकृष्ण मिशनच्या चंदीगड आश्रमात साधना केली होती.वयाच्या 21 व्यावर्षी त्यांनी नाथपंथी सिद्धयोगी लोरेकर महाराज यांच्याकडून विधिवत नाथ दीक्षा घेतली.
वारकरी संप्रदायाशी घनिष्ठ संबंध
संजय चव्हाण यांचा वेद ,उपनिषद पुराणे, इतर संस्कृत आणि प्राकृत धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास होता. वारकरी संप्रदायाशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला. विशेष म्हणजे त्यांनी दिव्य कुराणचीही पारायणे केली होती. त्यासाठी अरेबिक भाषेचे शिक्षण घेतले होते. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेकदा बौद्ध सांप्रदायिक विपश्यना साधना केली होती.
योगसाधना, व्यायाम, गिरीसंचार ,सायकलिंग यात त्यांना विशेष रस होता. त्यामुळे त्यांची प्रकृती एकदम तंदुरुस्त असायची. पण निर्व्यसनी आणि स्पष्टवक्ते असलेल्या संजय चव्हाण यांच्या प्रकृतीत 1998 च्या पोखरण अणुचाचणीनंतर फरक पडू लागला होता, अशी माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. संजय चव्हाण यांच्या पश्चात पत्नी , 2 अविवाहित कन्या , 2 भाऊ , 4 बहिणी असा मोठा परिवार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Raju Shetti : स्वाभिमानीची ऊस परिषद १५ ऑक्टोबरला; ‘जागर एफआरपी’तून शेतकऱ्यांना करणार जागे