PNB Scam | फरार नीरव मोदीला मोठा झटका, 1400 कोटींची मालमत्ता होणार जप्त
नीरव मोदी याची मुंबई, दिल्ली, जयपूर, अलिबाग, सूरत येथे मालमत्ता आहे. सुमारे 1400 कोटींच्या संपत्तीवर भारत सरकारचा अधिकार असेल. वरळी येथील समुद्र महल नावाच्या इमारतीत सहा अपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदीला पीएमएलए विशेष न्यायलयाने दणका दिला आहे. पीएमएलए न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी नीरव मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक गुन्हेगार फरार कायद्यांतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. यानुसार जप्त केलेल्या नीरव मोदींच्या सर्व मालमत्तांवर आता भारत सरकारचा ताबा असेल.
अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात नीरव मोदीच्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी याची मुंबई, दिल्ली, जयपूर, अलिबाग, सूरत येथे मालमत्ता आहे. सुमारे 1400 कोटींच्या संपत्तीवर भारत सरकारचा अधिकार असेल. या शहरांमध्ये नीरव मोदीची अलिशान घरं, फ्लॅट्स, कोट्यवधी रुपयांची अपार्टमेंट्स, कोट्यवधी रुपयांची आलिशान कार्यालये आणि बरेच भूखंड आहेत.
नीरव मोदीची कोट्यवधींची मालमत्ता
नीरव मोदीचे मुंबईतील वरळी येथील समुद्र महल नावाच्या इमारतीत सहा अपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. भारतातून फरार होण्यापूर्वी नीरव मोदी कुटुंबियांसह या अपार्टमेंटमध्ये राहत होता. नीरव मोदी याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही आहे, ही सर्व संपत्ती जप्त केली जाणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयाजवळ कालाघोडा भागात नीरव मोदीचं 3500 चौरस फुटांचं रिदम हाऊसच्या नावावर एक मोठं म्युझिक स्टोअर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील ब्रीच कँडी रोडला लागून असलेल्या एका उंच इमारतीत फ्लॅट आहे, तो देखील जप्त केला जाणार आहे. मुंबईतील ओपेरा हाऊसमध्ये 3 फ्लॅट आहेत. मुंबई, जयपूर, सूरत येथे फोरस्टार डायमंड्स कंपनीच्या नावावर कार्यालये आहेत. दिल्लीच्या पॉश भागात बरीच मालमत्ता आहेत. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये एक आलिशान कार्यालय आहे. महाराष्ट्रात अलिबागच्या समुद्रकिनारी एक बंगला आहे. या बंगल्यावरही नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप आहे.
याआधी 51 कोटींच्या वस्तूंचा लिलाव
या वर्षाच्या सुरुवातीला, मार्च 2020 मध्ये अंमलबाजवणी संचालनालयाने नीरव मोदीची बरीच मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव केला होता. नीरव मोदीच्या महागड्या पेंटिंग्ज, घड्याळ, पर्स, महागड्या गाड्या, हँडबॅग्ज यासारख्या वस्तूंचा लिलाव झाला आहे, ज्याद्वारे ईडीला सुमारे 51 कोटी रुपये मिळाले.
VIDEO | नीरव मोदीचा बंगला डायनामाईटने भुईसपाट | अलिबाग | एबीपी माझा