PM Modi Mumbai Visit:पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात प्रकल्प उद्घाटनांचा धडाका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रो 2ए, मेट्रो 7 मधील दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
![PM Modi Mumbai Visit:पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात प्रकल्प उद्घाटनांचा धडाका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती PM Modi to visit Mumbai Mumbai Metro lines 2A and 7 inauguration by PM Modi said CM Eknath Shinde PM Modi Mumbai Visit:पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात प्रकल्प उद्घाटनांचा धडाका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/dbae74e7ca09ed90ffe7893665313eb11673448938560290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CM Eknath Shinde On PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबईच्या दौऱ्यावर (PM Modi in Mumbai) येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईकरांसाठीच्या सेवांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई मेट्रो 2 ए (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumbai Metro 7) या मार्गिकेवरील सेवांच्या उद्घाटनासह मुंबई महापालिकेच्या (BMC) अखत्यारीत असलेल्या काही प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगामी मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी करण्यात आले होते. दोन्ही मार्गिकेवरील एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.
शिवडी- न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंकच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रकल्पासह पंतप्रधानांच्या दौऱ्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाचे उद्घाटन
मुंबई महानगरपालिकेच्या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (Sewage Treatment Plant) भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कॉंक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन रुग्णालयांसह 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या योजनेतंर्गत 52 दवाखान्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. सेंट्रल पार्क ते बेलापूर दरम्यान मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील मेट्रोदेखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई 'मेट्रो 2 ए'चा मार्ग (Metro 2A Route)
'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.
'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके (Metro 7 Route)
मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते आरे दरम्यान मेट्रो सेवा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)